अहमदनगर ( लोणी ) : एल्गार परिषदेचा तपास केंद्र सरकारने ज्या घाई गडबडीने एनआयएकडे दिला, त्यावरून हा निर्णय काळजी वाढवणारा आहे. पुरोगामी, दलित, आंबेडकरीवादी चळवळीला नक्षलवादी ठरवण्याचा केंद्र सरकारचा हा डाव असल्याचे यातून स्पष्ट दिसत असल्याचा आरोप महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दोन दिवसांपूर्वी केलं होत. यावरूनच भाजपचे नेते आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.
एल्गार परिषदेचा तपास एनआयएकडे देण्याबाबतच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला सरकारमधील घटक पक्षच करीत असलेला विरोध आश्चर्यकारक आहे. यावरून महाविकास आघाडीतील विसंवादी सूर समोर येऊ लागला आहे. एनआयएकडे तपास दिला तर भीती वाटायचे कारण काय? असा सवाल राधाकृष्ण विखे यांनी उपस्थित केला आहे.
मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय हा अभिनंदनीय आहे. यापूर्वी विरोधी पक्षनेते असताना हीच भूमिका आपण सभागृहात मांडली होती. मात्र आज वेगवेगळी मते मांडणाऱ्या लोकांना या विषयाची आठवण झाली आहे. यापूर्वी या विषयाबाबत हीच मंडळी गप्प होती. आता त्यांनीच माध्यमांचे लक्ष वेधले असल्याचा टोला विखेंनी लगवाला.
थोरात व्यक्त करत असलेली प्रतिक्रिया हे त्यांचे स्वतःचे मत नाही. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाबरोबर राहणे हे सूत्र स्विकारायचे असते. पण थोरातांना हा विषयच समजलेला नाही. आंबेडकरवादी चळवळीचा संदर्भ या विषयाशी नाही. कोणाच्या तरी सांगण्यावरुन त्यांनी केलेले वक्तव्य म्हणजे दुसऱ्याच्या हातातील बाहले बनून भूमिका मांडण्याचा प्रयल आहे. तर मुख्यमंत्र्यांचा सरकारवर कंट्रोल राहिलेला नाही, अशीही टीकाही विखेंनी केली.