श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : पंतप्रधान मोदींमुळे भारताची अर्थव्यवस्था ही तिसऱ्या क्रमांकावर आली. त्याकडे विस्तृत नजरेतून पहायला हवे. देशाचा पोशिंदा असलेला शेतकरी आणि देशाचे संरक्षण करणारा जवान यांच्यासाठी समर्पित भावनेने काम करणाऱ्यांबद्दल आदर निर्माण झाला तर देशाचा विकास होईल, असे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त येथील स्वयंवर मंगल कार्यालयात आयोजित तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या नियोजनाच्या बैठकीत मंत्री विखे बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, भाजप तालुकाध्यक्ष दीपक पटारे, ज्येष्ठ नेते इंद्रनाथ थोरात, नानासाहेब पवार, शरद नवले, उपसभापती अभिषेक खंडागळे, मारुती बिंगले, केतन खोरे, गिरीधर आसने, नितीन दिनकर आदी उपस्थित होते.
विखे पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे कोविड काळात कोट्यवधी लोकांना लस मिळाली. गरजू घटकांना मोफत धान्य दिले जात आहे. २०२४ पर्यंत प्रत्येक घराला नळाने पाणी पुरवले जाणार आहे. मात्र ज्यांनी या सेवा दिल्या, त्यांच्याबद्दल आपण संवेदना व्यक्त करतो का? याचाही अंतर्मुख होऊन विचार करावा. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देश सामर्थ्याने पुढे जात आहे. विश्वनेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. अशावेळी आपला पक्ष, देश, नेता, आपली योजना या भावनेतून किती कार्यकर्त्यांनी फलक लावले? संघटनेचे बळकटीकरण करण्यासाठी यापुढे कार्यकर्त्यांना आचारसंहितेची चौकट तयार करावी लागेल. पक्षाचा सभासद आहे की नाही हे पाहून शिस्त लावावी लागेल.