अहमदनगर - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. राधाकृष्ण विखे भाजपात प्रवेश करणार नसल्याचे खुद्द त्याचे सुपुत्र आणि भाजपाचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी सांगितलं आहे. त्यामुळे लोकमतचे संयमी वृत्तांकन खरे ठरले असून नगर जिल्ह्यात त्याचे कौतुक करण्यात येत आहे. कारण, याबाबत विखेंच्या निकटवर्तीयांशीही आम्ही संपर्क साधला होता. त्यामुळे, त्यांच्या भाजपा प्रवेशासंदर्भातील कुठलिही बातमी लोकमतने दिली नव्हती.
माझे वडिल काँग्रेसमध्ये राहणार असल्याचे सुजय यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. वडिल काँग्रेसमध्ये असताना मी भाजपात प्रवेश केलेला आहे. सध्या निवडणूक असून ही वैयक्तिक बाब आहे. त्यामुळे राधाकृष्ण यांनी भाजपात प्रवेश करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे सुजय यांनी म्हटले आहे. त्यामुळे, गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या भाजपा प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. राधाकृष्ण विखे हे भाजपाचा प्रचार करत आहेत. आपल्या मुलासाठी ते काँग्रेसविरोधी भूमिका घेत आहेत. त्यामुळे मोदींच्या सभेत ते भाजपात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या अनेक माध्यमांनी दिल्या होत्या, मात्र, लोकमतने याबाबत कुठलाही अतातायीपणा न दाखवता विखेंच्या भाजपा प्रवेशाची बातमी दिली नाही. अखेर, लोकमतच्या सुत्रांची बातमी खरी ठरली असून राधाकृष्ण हे भाजपात जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ऑनलाईनच्या जगतात, निवडणुकांच्या रणधुमाळीतही पुन्हा एकदा लोकमतने सत्य आणि संयमी वृत्तांकन करत वाचकांचा विश्वास सार्थ ठरवला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींची भाजपाचे उमेदवार सुजय विखे-पाटील यांच्या प्रचारासाठी आज अहमदनगरमध्ये सभा होत आहे. याची जय्यत तयारीही करण्यात आली आहे. याच सभेत राधाकृष्ण विखे-पाटील भाजपात प्रवेश करतील अशी चर्चा होती. मात्र, आता ही केवळ अफवाच ठरली आहे.
दरम्यान, आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासमवेत बारागाव नांदूर ते राहुरी असा एका वाहनातून प्रवास करण्याचा योग जुळवून आणताना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी कर्डिले यांच्याशी राजकीय खलबते केली. त्यानंतर दोघांनीही राहुरीत सुजय विखे यांच्यासाठी मोर्चेबांधणी केली. राहुरी येथे पोहोचल्यानंतर तालुका काँग्रेस आयचे अध्यक्ष रावसाहेब तनपुरे यांच्या निवासस्थानी जाऊन विखे-कर्डिले यांनी राहुरी शहरातील 36 बुथचा आढावा घेतला. विविध समाजातील नागरिकांशी चर्चा करून दक्षिण नगर मतदारसंघात भाजप उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्यासाठी बांधणी केली आहे.