संगमनेर/आश्वी : प्रबोधनकार निवृती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्याबाबत सरकारने संवेदनशीलता दाखवायला हवी होती, पण तसे घडले नाही. आता कायदेशीर प्रक्रिया सुरू राहील. परंतू महाराजांच्या कामाला लोकमान्यता असल्याने त्यांनी प्रबोधनाचे काम सुरू ठेवावे. भविष्यातील लढाईसाठी आम्ही त्यांच्याबरोबर आहोत, असे माजी मंत्री, आमदार राधाकृष्ण विखे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
प्रबोधनकार निवृती महाराज देशमुख यांच्या संगमनेर तालुक्यातील ओझर बुद्रुक येथील निवासस्थानी शनिवारी ( २५ जुलै) आ. राधाकृष्ण विखे यांनी इंदोरीकर महाराजांची सदिच्छा भेट घेतली. या दोघांनी बंद खोलीत अर्धा तास चर्चा केली. आ.विखे यांनी त्यांच्या कुटुंबियांसमवेत संवाद साधला. भगवद् गीतेची प्रत देवून इंदोरीकर महाराजांनी आ.विखे यांचे स्वागत केले.
इंदोरीकर महाराजांविषयी सुरू असलेल्या न्यायालयीन प्रक्रियेबाबत अधिक भाष्य करणार नाही. कायद्याला कायद्याचे काम करू द्यावे. परंतू महाराजांनी संत विचारांनी सुरु केलेले प्रबोधनाचे काम सुरू ठेवावे हेच सांगण्यासाठी आज त्यांची भेट घेतली आहे. सरकारने महाराजांबाबत सहानुभूती दाखवायला हवी होती. पण सध्या सरकारच असंवेदनशील झाले आहे. महाराजांनी संत विचारांनी राज्यात सुरू केलेल्या प्रबोधनाच्या कार्याला लोकमान्यता मिळाली आहे. त्यांनी सुरू केलेल्या कामाला अध्यात्मिक अधिष्ठान आहे. असेच काम त्यांनी भविष्यातही सुरू ठेवावे. या कामाला आणि भविष्यातील लढाईसाठी त्यांना आमचे पाठबळ निश्चितच राहील, असा दिलासा आपण त्यांना दिला असल्याचे आ.विखे यांनी सांगितले.