शिवाजी पवार
श्रीरामपूर (जि.अहमदनगर) : संगमनेर व प्रवरा सहकारी साखर कारखान्यांनी जिल्ह्यातील इतर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात ऊस तोडणीची घुसखोरी करू नये, असे आवाहन माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी केले आहे. संगमनेर साखर कारखाना हा गणेश कारखान्याचा ऊस नेणार नाही तसेच गणेश कारखान्याची काळजी असेल तर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनीही 'गणेश' चा ऊस नेऊ नये, असे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. या सूचनेबद्दल मुरकुटे यांनी थोरात यांचे कौतुक केले आहे. गणेशसह, अशोक, अगस्ती व अन्य कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात अतिक्रमण न करण्याचा निर्णय थोरात यांनी घ्यावा, असे मुरकुटे यांनी सुचविले आहे.
मुरकुटे म्हणाले, थोरात हे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. आता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे हे पालकमंत्री आहेत. या नात्याने दोघांनीही जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांना समान न्याय देऊन पालकत्व करायला हवे. कोणत्याही कारखान्याच्या कार्यक्षेत्रावर अतिक्रमण करू नये. आमदार थोरात यांनी त्यांच्या विधानात संगमनेर, संजीवनी कारखाना 'गणेश' चा ऊस नेणार नाहीत, तसेच प्रवरा कारखान्याने 'गणेश' चा ऊस नेऊ नये, असे म्हटले आहे. यावरून संगमनेर व प्रवरा दोन्हीही कारखाने गणेश कारखान्याचा ऊस नेत होते आणि त्यामुळे गणेश अडचणीत आला हे सिद्ध होते, असा आरोप मुरकुटे यांनी केला.
संगमनेर व प्रवरा कारखाने हे स्वतःच्या कार्यक्षेत्रातील ऊस तसाच ठेवून गणेश, अशोक, अगस्ती यासह अन्य कारखान्यांनी मेहनतीने आपापल्या क्षेत्रात वाढ केलेल्या उसावर डल्ला मारतात. बाहेरचा ऊस आधी तोडतात आणि कार्यक्षेत्रातील ऊस नंतर तोडतात. उशिरा ऊस तोडल्याने त्याच्या खोडक्या होऊन उत्पादन घटते. त्यामुळे प्रवरा व संगमनेर कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकरी ऊस लागवड करत नाहीत. विखे-थोरातांच्या कार्यक्षेत्रात उसाचे क्षेत्र वाढत नाही आणि कार्यक्षेत्राबाहेरील उसावर अवलंबून राहावे लागते. ऊस पळविल्याने कारखाने आजारी पडतात. संगमनेर व प्रवरा कारखाना एकमेकांच्या कार्यक्षेत्रातील ऊस मात्र तोडत नाही. या दोघांची मिलीभगत आहे, अशी टीका मुरकुटे यांनी केली आहे.
कार्यक्षेत्रात पुरेसा ऊस नसताना संगमनेर व प्रवरेने गाळप क्षमता वाढविली. आपले पोट भरण्यासाठी दुसऱ्यांना उपाशी ठेवणे उचित नाही. दोन्ही कारखान्यांनी उसाबाबत स्वावलंबी व्हावे. अन्य कोणत्याही कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात घुसखोरी करु नये. तशी सद्बुद्धी साईबाबांनी दोघांनाही द्यावी, टिप्पणी मुरकुटे यांनी केली आहे.