राहुरी : दक्षिण नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या मुळा धरणात सलग तीन वर्षात पहिल्यांदाच अतिरिक्त पाणीसाठा राहिला आहे. यंदा धरणात १ हजार ५०० दशलक्ष घनफूट पाणी साठा अतिरिक्त राहणार आहे. त्याचा वापर पुढील हंगामासाठी करण्यात येणार आहे.
२६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून शेतीसाठी उन्हाळी पहिले आवर्तन सुरू आहे. उजवा कालव्याखाली ३० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आल्यानंतर उजवा कालवा बंद करण्यात येणार आहे. डावा कालवा साधारण एक-दोन दिवस सुरू राहणार आहे. तीन हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणे अपेक्षित आहे.
मुळा धरणात सध्या १८ हजार २२६ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. तर उपयुक्त पाणीसाठा १३ हजार ७२६ दशलक्ष घनफूट इतका आहे. त्यामध्ये साडेचार हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठा राखीव आहे. मुळा धरणातून पाणी आवर्तन संपल्यानंतर सात हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक राहण्याची शक्यता आहे. त्यापैकी उन्हाळी दुसऱ्या आवर्तनासाठी पाच हजार दशलक्ष घनफूट पाणी शेतीसाठी उपयोगात येणार आहे. उरलेले दीड हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठा पुढील हंगामासाठी उपयोगात येणार आहे.