नेवासा : मुळा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मंगळवारी मुदत संपली. १३८ पैकी ११७ जणांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मंत्री शंकरराव गडाख यांना यश आल्याने त्यांचे कारखान्यावरील वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी मुळा कारखान्याची निवडणूक बिनविरोध झााल्याचे जाहीर केले. यानंतर अविरोध निवडून आलेल्या २१ संचालकांची नावे जाहीर केली. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली मुळा कारखान्याची वाटचाल चालू आहे.
सुरुवातीला निवडणुकीत २१ संचालकासाठी एकूण १३८ उमेदवारी अर्ज पात्र ठरले होते. त्यापैकी ११७ उमेदवारांनी माघार घेतल्याने निवडणूक बिनविरोध घोषित करण्यात आली. मुळा कारखान्याचे संस्थापक माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी व त्यानंतर मंत्री शंकरराव गडाख यांनी या कारखान्याची धुरा संभाळली आहे. सभासद व ऊस उत्पादकांच्या हिताचे निर्णय घेण्याची परंपरा या कारखान्याने जपली असल्याने आतापर्यंतच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत.
....
बिनविरोध उमेदवार असे-
उत्पादक सभासद-सोनई गट -कारभारी डफाळ, शंकरराव गडाख.
घोडेगाव गट - बाबूराव चौधरी, लक्ष्मण पांढरे.
खरवंडी गट– भाऊसाहेब मोटे, बापूसाहेब शेटे.
करजगाव गट- संजय जंगले, बबन दरंदले, दामोदर टेमक.
नेवासा गट - नीलेश पाटील, नारायण लोखंडे, बाबासाहेब भणगे.
प्रवरासंगम गट- बाळासाहेब पाटील, बाळासाहेब गोरे, कडूबाळ कर्डिले.
संस्था मतदारसंघ-नानासाहेब तुवर.
अनुसूचित जाती-जमाती -कडूबाळ गायकवाड.
महिला प्रतिनिधी - ताराबाई पंडित, अलका जंगले.
इतर मागासवर्ग मतदार संघ- बाळासाहेब बनकर.
भटक्या विमुक्त जाती-बाळासाहेब परदेशी
...
सभासदांनी व अर्ज भरलेल्या उमेदवारांनी कारखान्याच्या हिताचा विचार करून निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेण्यासाठी मनाचा जो मोठेपणा दाखविला त्याबद्दल मी त्यांचे सर्व सभासदांच्या वतीने आभार मानतो. कारखान्याच्या माध्यमातून आतापर्यंत सभासदहित जपण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. यापुढच्या काळातही सभासदाचा हा विश्वास जपण्याची आणि सभासदाच्या हिताचे निर्णय घेण्याची जी परंपरा गडाख साहेबांनी घालून दिली आहे ती कायम राखली जाईल.
-शंकरराव गडाख, मंत्री.