शिर्डी : केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि प्रशासकीय व्यवस्थापनाचा उत्कृष्ठ दर्जा राखल्यामुळे राहाता पंचायत समिती यंदाही नाशिक विभागात अव्वल ठरली आहे. यशवंत पंचायत राज अभियानात अकरा लाखांचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार राहाता पंचायत समितीने पटकावला आहे.
राहाता पंचायत समितीने केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची केलेली अंमलबजावणी तसेच विविध राबविलेले सामाजिक उपक्रमामुळे राज्यस्तरावर पंचायत समितीला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाल्याचे सभापती नंदाताई तांबे आणि उपसभापती ओमेश जपे यांनी सांगितले. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांबरोबरच स्वच्छ भारत मिशन, घरकुल योजना, बायोगॅस, विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी या उपक्रमांबरोबर वेळेवर घेण्यात आलेल्या मासिक सभा, सामाजिक बांधिलकीतुन प्लॅस्टीक बंदी, बेटी बचाव बेटी पढाओ अभियान, आरोग्य विषयक कार्यशाळा, पर्यावरण पुरक कार्यक्रम, हागणदारी मुक्त तालुका आणि माहीती आधिकार कार्यशाळा या बरोबरच पंचायत समिती आयएसओ मानांकन मिळालेली असल्याने प्रशासकीय कामकाजात आलेली गतिमानता, लेखा परिक्षणाची वेळोवेळी पुर्तता करण्यात सातत्य राखल्यामुळेच राहाता पंचायत समितीला विभाग स्तरावरील पुरस्कार मिळण्यात यश आले असल्याचे गटविकास आधिकारी समर्थ शेवाळे यांनी सांगितले.