शिर्डी : कोरोना संदर्भात जगभर चिंतेचे वातावरण असताना राहाता तालुक्यासाठी मात्र दिलासादायक बातमी आहे. राहात्यात एकमेव आढळलेल्या रूग्णाचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने राहाता तालुका कोरोनामुक्त झाला असल्याची माहिती राहात्याचे तहसिलदार कुंदन हिरे यांनी दिली.तालुका कोरोनामुक्त झाला असला तरीही लॉकडाऊनमध्ये कोणताही बदल झालेला नाही. नागरीकांनी पुर्वीप्रमाणेच लॉकडाऊनचे पालन करावे, असेही हिरे यांनी स्पष्ट केले आहे.दिल्लीतील कार्यक्रमात सहभाग घेऊन आलेला इंडोनेशियातील व्यक्ती कोल्हार, भगवतीपूर, लोणी खुर्द, लोणी बुद्रूक, हसनापूर, दाढ बुद्रूक, पाथरे व हनमंतगाव या सात गावातील २५ व्यक्तींच्या संपर्कात आला होता. या व्यक्तींचे स्त्राव तपासणीसाठी पाठवले असता त्यातील लोणी खुर्दमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीच्या स्त्रावाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या व्यक्तीवर ४ एप्रिलपासून अहमदनगरला शासकिय रूग्णालयात उपचार सुरू होते. चौदा दिवसानंतर त्याचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने तालुका प्रशासनाने सुटकेचा निश्वास टाकला आहे.दरम्यान या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या ५५ व्यक्तींनाही शिर्डी येथील संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्या सर्वांमध्ये चौदा दिवसात कोणतीही लक्षणे आढळली नाही. त्या सर्वांची राहाता ग्रामीण रूग्णालयात तपासणी करून त्यांनाही घरी सोडण्यात आल्याचे तहसिलदार हिरे यांनी सांगितले.
राहाता तालुका कोरोनामुक्त झाला असला तरी ही परिस्थीती कायम ठेवण्यासाठी सर्व नागरीकांनी खबरदारी घ्यावी. प्रशासनाला सहकार्य करावे. कोणी बाहेरील व्यक्ती आली असल्यास तत्काळ प्रशासनाला कळवावे.-गोविंद शिंदे, प्रांताधिकारी