अकोले (जि. अहमदनगर) : दुर्मीळ पारंपरिक गावराण वाणांच्या बियाणांचे जतन करणाऱ्या ‘सीड मदर’ राहिबाई सोमा पोपेरे यांचे घर व बियाणे बँक वास्तूचे लोकार्पण रविवारी येथे झाले. भाजपा सरकारने साडेचार वर्षात ८ लाख हेक्टर शेती ओलिताखाली आणली आणि यापूर्वीच्या सरकारने ७० वर्षात ३२ लाख हेक्टर शेती बागायती केली, असे सांगत गाव-खेड्यांच्या विकासासाठी गावोगावी ‘राहिबाई’ तयार व्हाव्यात, अशी अपेक्षा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.महिला स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजेत. महिला श्रीमंत झाली तर घर श्रीमंत होईल. गावातील माणूस श्रीमंत झाला तर खेडी श्रीमंत होतील. म्हणून विकास कामांसाठी गावकऱ्यांनी एकजूट दाखवावी, असा सल्ला देत मंत्री पाटील यांनी राहिबाई व बायफ यांच्या कार्याचे कौतुक केले. पालकमंत्री राम शिंदे यांनीही मार्गदर्शन केले. राहिबाई यांनी बँकेच्या निर्मितीबाबत समाधान व्यक्त केले.>‘लोकमत’ने उजेडात आणले कामराहिबाई पोपेरे यांनी ५३ पिकांचे ११४ गावरान वाण शास्त्रशुध्द पद्धतीने जतन केली आहेत. अशिक्षित असूनही कृषीचे पदवीधर त्यांच्याकडून बियाण्यांबद्दल धडे घेतात. बीबीसीच्या शंभर प्रेरणादायी महिलांच्या यादीत भारतातून त्यांची निवड झाली. लोकमत सखी मंचच्यावतीने राहिबार्इंना गौरविण्यात आले. लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर-२०१९ साठीही त्यांचे नामांकन होते. त्याचे काम सर्वात आधी ‘लोकमत’ने उजेडात आणले. याच कार्याबद्दल ७ मार्चला त्यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत गौरव होणार आहे.
राहीबाई पोपेरे यांचे बियाणे बँकेचे स्वप्न आले सत्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2019 5:09 AM