राहुल गांधींचे विधान देशाला बदनाम करणारे: केंद्रीय मंत्री कराड यांची टीका
By अरुण वाघमोडे | Published: March 26, 2023 04:45 PM2023-03-26T16:45:37+5:302023-03-26T16:46:02+5:30
खासदार हे न्यायालयात दोषी आढळले तर त्यांना या पदावर राहता येणार नाही, असा निकला सुप्रीम कोर्टाने दिला होता
अहमदनगर: भारत देशाची जगात प्रथम क्रमांकाची लोकशाही आहे. राहुल गांधी यांनी मात्र इंग्लडमध्ये जाऊन भारतात लोकशाही नाही, असे वक्तव्य केले. त्यांचे हे वक्तव्य देशाला बदनाम करणारे आहे. असे मत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी व्यक्त केले.
मंत्री कराड (दि.२६) यांनी रविवारी नगर येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी म्हणाले भारतीय जनता पक्ष हा न्यायदेवतेला मानणारा आहे. राहुल गांधी यांच्याबाबत न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर संसद सचिवालयाने त्यांची खासदारकी रद्द केली. दरम्यान आमदार, खासदार हे न्यायालयात दोषी आढळले तर त्यांना या पदावर राहता येणार नाही, असा निकला सुप्रीम कोर्टाने दिला होता. या निर्णयाविरोधात तत्कालीन मनमोहन सिंग सरकारने अध्यादेश आणला होता. त्यावेळी राहुल गांधी यांनीच या अध्यादेशाला विरोध दर्शविला होता.
आता त्याच नियमानुसार त्यांच्यावर कारवाई झाल्याचे मंत्री कराड यांनी सांगितले. केंदाचा यंदाचा ४५ लाख ३ हजार २७० कोटींचा अर्थसंकल्प आहे. २०१६ रोजी अर्थसंकल्प १६ लाख कोटींचा होता. गेल्या नऊ वर्षांत पावणेतीन पटीने यात वाढ झाली आहे. या अर्थसंकल्पात संरक्षण, ट्रान्सपोर्ट, रेल्वे यासह विविध घटकांसाठी मोठी तरतूद केलेली आहे. यातून देशासह महाराष्ट्रातील बहुतांशी रेल्वेस्थानकांचा पुनर्विकास केला जाणार आहे. तसेच अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून केंद्राकडून शेतकऱ्यांसाठी भरीव मदत दिली जाणार आहे. असे ते म्हणाले.
लोकसभेच्या ४८ तर विधानसभेच्या २००च्यावर जागा जिंकणार
भाजपाने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. भाजप, शिवसेना (शिंदे गट) व आरपीआय अशा संयुक्त आघाडीने आम्ही लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका लढविणार आहोत. महाराष्ट्रात मागीलवेळी लोकसभेच्या आमच्या युतीने ४३ जागा जिंकल्या होत्या. आता लोकसभेच्या ४८ तर विधानसभेच्या २००च्यावर जागा जिंकण्याचे आमचे उदिष्ट आहे. राज्यात शिवसेनेशी जागावाटबाबत वरिष्ठ नेत्यांकडून निर्णय घेतला जाईल. असे मंत्री कराड यांनी सांगितले.