पारनेर : पारनेर पंचायत समितीचे सभापती राहुल झावरे यांनी आपल्या पदाचा मंगळवारी राजीनामा दिला. यावेळी त्यांनी आमदार विजय औटी यांच्यावर टीका केली. झावरे यांचा राजीनामा औटी यांना मोठा धक्का समजला जातो. राहुल झावरे हे काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी आमदार नंदकुमार झावरे यांचे सुपुत्र आहेत. मागील तीनही विधानसभा निवडणुकीत नंदकुमार झावरे गटाने विजय औटी यांना साथ दिली होती. मात्र विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार विजय औटी यांनी त्यांच्या प्रचारात किंवा प्रचार पत्रकावर स्व.बाळासाहेब विखे, नंदकुमार झावरे यांचा कुठेही उल्लेख केला नाही व फोटोही टाकले नाहीत. त्यामुळे झावरे समर्थक नाराज होते. मंगळवारी सकाळी पारनेर पंचायत समितीचे सभापती राहुल झावरे यांनी सभापतीपदाचा राजीनामा दिला. ज्यांनी नंदकुमार झावरे यांचा नामोल्लेख टाळला त्यांचे मी नावही घेणार नाही. पण त्यांच्यावर माझे वडील, माजी आमदार नंदकुमार झावरे यांनी सातत्याने प्रेम केले. तेच राजकीय वारसदार झावरे यांचा इतिहास संपविण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामुळे आमच्या कुटुंबाला वेदना झाल्याचे राहुल झावरे यांनी सांगितले. आमच्या मनातील वेदना गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे यांना कळविले आहेत. त्या कुटुंबाचे गेली तीन-चार महिने खूप कठीण काळातून गेले आहेत. त्यामुळे त्यांना या भूमिकेत कोणीही ओढू नये, असेही झावरे यांनी सांगितले.माजी जिल्हा परिषद सदस्य आझाद ठुबे यांच्या कान्हुरपठार ग्रामपंचायतीमधील गैरप्रकाराबाबत अनुपालन ठराव करण्यास खासदार सुजय विखे यांनी सांगूनही औटी यांनी विरोध केला होता. स्वत:च्या निवडणुकीत रात्रीतून चार सदस्यांचा सह्या घेऊन ठराव तयार केला. मग सुजय विखे यांच्या निवडणुकीवेळी तो ठराव का दिला नाही? असा आरोप सभापती झावरे यांनी करून आझाद ठुबे व आमच्यात वैर नसल्याचे सांगितले.
राहुल झावरे यांचा सभापतीपदाचा राजीनामा; विजय औटी यांना धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 4:45 PM