राहुरी : शहरात होत असलेली वाहतुकीची कोंडी मोकळी करण्यासाठी शनिवारी पोलीस व नगरपालिका प्रशासनाने संयुक्त कारवाई केली. रस्त्यावर बसणारे व्यापारी व वाहन पार्किंगसाठी पाच फूट जागा मोजून आखणी करून दिली. काहींना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
आखणीच्या बाहेर दुकान लावल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे पोलीस व पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. २७ फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजेदरम्यान पोलीस प्रशासन व नगरपरिषद प्रशासनाने संयुक्त कारवाई हाती घेतली. राहुरी शहरात रस्त्यावर लागणारी छोटी-मोठी दुकाने, हातगाड्या यांच्यामुळे नेहमीच वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याची दखल घेऊन शहरातील शनिचौक ते नगर-मनमाड रोडपर्यंत ही कारवाई करण्यात आली. सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मुंबई पोलीस कायदा कलमानुसार वाहतूक अडथळा निर्माण करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांनी दिली.
या वेळी पोलीस उपनिरीक्षक नीलेशकुमार वाघ, हवालदार रवींद्र डावखर, संतोष राठोड, शहामद शेख, भारत थोरात, नगर परिषदेमधील राजेंद्र पवार, बाबासाहेब गुंजाळ, संतोष वावरे, प्रसाद लाहुंडे, किशोर जगधने, सचिन वावरे उपस्थित होते.
...
प्रशासनाला सहकार्य करा
नागरिकांनी सूचनांचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे. होणाऱ्या दंडात्मक कारवाईपासून वाचावे. शहरात वाहतुकीची कोंडी होऊ नये याची दक्षता घ्यावी, असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्रीनिवास कुरे यांनी केले आहे.
...