राहुरी : मोटारसायकल चोरून फिर्यादीकडे पैशाची मागणी करणाºया एका आरोपीस राहुरी पोलिसांनी बुधवारी दुपारी सापळा रचून पकडले. त्याच्याकडून १३ मोटारसायकली जप्त केल्या आहेत. ४ मोटारसायकली मुळा धरणात टाकून दिल्याची कबुली चोरट्याने राहुरी पोलिसांना दिली.पोलीस अधीक्षक सागर पाटील व पोलीस अधीक्षक डॉ़दीपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या सूचनेनुसार राहुरी पोलिसांनी ही कारवाई केली. राहुरी पोलिसांना मिळालेल्या गुप्त खब-यामार्फत राहुरी पोलिसांनी मोटारसायकलच्या मालकाशी संपर्क साधला. त्यानुसार पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी बुधवारी दुपारी बारागान नांदूर येथे सापळा लावला. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बागुल, सहायक पोलीस निरीक्षक यशवंत राक्षे, पोलीस उपअधीक्षक यशवंत राक्षे, उपनिरीक्षक गणेश शेळके,पो. हे. काँ. संजय पठारे, अमित राठोड, शिवाजी खरात, निलेश मेटकर, सचिन ताजणे, आजिनाथ पाखरे, प्रवीण अहिरे यांनी आरोपी आकाश आहेर याला सापळा लावून पकडले. आहेर याने त्याचे साथीदार गणेश शेटे, सनी बाचकर यांनी राहुरी परिसरातून १३ मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन बागुल हे करीत आहेत. आरोपीस राहुरी न्यायालयासमोर हजर केले असता त्यास तीन दिवसांची पोलीस कस्टडी दिली आहे.मोटारसायकल मालकांकडून पैशांची वसुलीमुळा धरणात चोरलेल्या मोटारसायकली टाकल्या जातात अशी ओरड मोटारसायकल मालकांकडून करण्यात येत होती. चोरटे मोटारसायकल चोरल्यानंतर मालकास फोन करून मोटारसायकलच्या परिस्थितीनुसार रक्कम वसुल करीत असत. मुळा धरणात आणखी मोटारसायकली सापडतील का? यादृष्टीने तपास सुरू आहे. मोटारसायकली चोरांबद्दल कुणाला काही माहिती सांगायची असल्यास राहुरी पोलीस स्टेशनची संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी केले आहे.
राहुरी पोलिसांनी पकडल्या चोरीच्या १३ मोटारसायकली; सापळा लावून एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 4:57 PM