कर्जत : तालुक्यातील सिद्धटेक, दुधोडी शिवारात भीमा नदीपात्रात छापा टाकून यांत्रिक बोट आणि एक मशीन असा एकूण सहा लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना आज न्यायालयात हजर केले असता दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यातील चौथा आरोपी फरार आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील सिद्धटेक, दुधोडी शिवारात भीमा नदीपात्रात अवैध वाळू उपसा चालू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी बुधवारी पहाटे पोलीस पथकाने भीमा नदीपात्रात स्पीड बोटच्या साह्याने प्रवेश करून एक यांत्रिक बोट व उपसा करणारे मशीन असा सहा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला.
मजहरुल शेख (वय १९), हुमायून शेख (वय १९), अलीम शेख (वय २५, रा. कठ्ठलवाडी, साहेब गंज, झारखंड. सध्या रा. खेड, ता. कर्जत, जि. नगर) यांना ताब्यात घेतले आहे. त्यांना बुधवारी येथील न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
या पथकात उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने, पोलीस कर्मचारी सागर मेहेत्रे, सुनील खैरे, मनोज लातूरकर यांच्यासह होमगार्ड संतोष निकत, गवळी यांनी सहभाग नोंदविला.