विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव शिवारात नगर-दौंड रस्त्यावर कावेरी ढाब्यावर बेलवंडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संपतराव शिंदे यांनी गुरुवारी दुपारी छापा टाकून दारूसाठासह एका महिलेस अटक केली आहे.
याबाबत कोळगाव शिवारात कावेरी ढाब्यावर पत्र्याच्या शेडमध्ये देशी व विदेशी दारूचा साठा असल्याची माहिती खबऱ्यामार्फत बेलवंडी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे, पोलीस कर्मचारी संतोष गोमसाळे, हसन शेख, ज्ञानेश्वर पठारे, रावसाहेब शिंदे, दिवटे, भाऊसाहेब शिंदे, अविंदा जाधव, विद्या धावडे, होमगार्ड सचिन काळाणे यांनी छापा टाकला. त्यावेळी त्यांना ९६ हजार ३०० रुपये किमतीची देशी व विदेशी दारूचा साठा सापडला. या ठिकाणी रोहिणी सतीश घोंडगे ही महिला दारू विक्री करत असल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी तिला अटक केली. पोलीस नाईक अविंदा जाधव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.