बेलवंडी : श्रीगोंदा तालुक्यातील कोंडेगव्हाण येथे जुगार अड्ड्यावर बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांच्या पथकाने छापा टाकून तिरट नावाचा हारजितीचा जुगाराचा खेळ खेळत असलेल्या पाच जुगाऱ्यांना पकडले. ८ हजार ७२० ची रोकड, तीन मोटारसायकल असा ३ लाख ५८ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांना कोंडेगव्हाण येथे मारुती मंदिराच्या बाजूस वडाच्या झाडाखाली उघड्यावर जुगार चालू असल्याची माहिती खबऱ्यांकडून मिळाली. त्यावरून पोलीस पथकाने छापा टाकला असता तेथे ५ जण तिरट नावाचा हारजितीचा जुगाराचा खेळ खेळत असलेले आढळून आले. पोलिसांनी त्यांना मुद्देमालासह ताब्यात घेतले. पो. काँ. विकास कारखिले यांच्या फिर्यादीवरून रामनाथ कचरू मगर (वय २८), भिवसेन दिलीप मगर (वय ३२), संतोष सुदाम मगर (वय ३८), उमेश दत्तात्रय गोंठे (वय ४३), राजू सर्जेराव साळवे (वय ३६) सर्व रा. कोंडेगव्हाण यांच्यावर बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. ही कारवाई संपतराव शिंदे, पो. ना. संतोष गोमसाळे, पठारे ज्ञानेश्वर, पो. कॉ. रामदास भांडवलकर, गोरख गायकवाड, विकास कारखिले, विकास सोनवणे यांनी केली आहे.