शेवगाव : येथील नेवासा रस्त्यावरील एका लॉजवर सुरू असलेल्या कुंटणखान्यावर नगर येथील अनैतिक मानवी व्यापार शाखेच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने शनिवारी रात्री उशिरा छापा टाकला. येथील दोन महिलांची सुटका करून तिघांना अटक करण्यात आली.
छाप्यादरम्यान मिळून आलेल्या दोन महिलांची पुणे येथील महिला सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. सेवाभावी संस्थेचे संदेश किसन जोगेराव यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
शेवगाव येथील नेवासा रस्त्यावरील सागर लॉजवरील कुंटणखान्यात लहान मुली, महिलांकडून देहविक्री व्यवसाय करवून घेतला जात असल्याची माहिती एक महिन्यापूर्वी पुणे येथील फ्रीडम फर्म सेवाभावी संस्थेला मिळाली होती. त्यानंतर संस्थेचे सदस्य अश्विन राठोड, सीमा आरोळे, सत्यजित देसाई आदींनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. कुंटणखान्यातील मुली व महिलांची सुटका करण्याची मागणी केली. त्यानुसार पोलीस अधीक्षक यांनी पोलीस निरीक्षक रणजित ढेरे, मानवी व्यापार शाखेचे सतीश गावित यांना कारवाई करण्यास सांगितले. त्यांनी शेवगाव येथे दाखल होताच ही माहिती पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंढे यांना सांगितले. त्यानंतर नगर येथील पथक व स्थानिक पोलीस पथकाने सापळा रचला. समाजसेवी संस्थेच्या मदतीला आलेले मालोजी सूर्यवंशी यांना बनावट ग्राहक बनवून त्यांच्याकडे पाचशे रुपयांच्या सात नोटा, असे साडेतीन हजार रुपये दिले. सर्व सूचना देऊन आतमध्ये खातरजमा करण्यासाठी पाठविले. या ठिकाणी कुंटणखाना सुरू असल्याची खात्री होताच सूर्यवंशी यांनी पोलिसांना इशारा केला. त्यानंतर पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंढे यांच्यासह पथकाने छापा टाकून तेथील दोन महिलांना ताब्यात घेऊन इतर तिघांना अटक केली.
यावेळी सचिन रूपचंद मुसावत (रा. शेवगाव), संदीप माणिक शेळके (रा. रामनगर नेवासा रस्ता, ता. शेवगाव), अमर अश्पाक शेख (रा. पिंगेवाडी, ता. शेवगाव) यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून ८३ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.