कोपरगाव : नाशिक धरणक्षेत्रात व गोदावरी नदीच्या लाभक्षेत्रासह कोपरगाव तालुक्यात रविवारपासून दररोज मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे शुक्रवारी (दि.२३) दुपारी तीन वाजेच्या सुमारास गोदावरी नदीच्या पाण्यात अचानक वाढ झाली. त्यामुळे वारी येथील गोदावरी नदीवरील पुल पाण्याखाली गेल्याने नदीकाठच्या गावातील संपर्क तुटला होता.
सध्या जोरदार पावसामुळे धरण क्षेत्रात पाण्याची आवक वाढल्याने नांदूर मध्यमेश्वर धरणातून शुक्रवारी गोदावरीत ३ हजार ६०० क्युसेकने पाणी सुरु आहे. सर्वत्र मुसळधार पावसामुळे नांदूर मध्यमेश्वर धरणाच्या पुढील गोदावरी नदीच्या लाभक्षेत्रातील ओढे, नाले यांचे पाणी सरळ नदीत येत आहे. त्यातच नदीवरील सर्वच बंधाऱ्यावर पाणी अडविण्यासाठी प्लेटा टाकलेल्या असल्याने पाण्याचा फुगवटा तयार झाला आहे.
वारीच्या पुलाची उंची कमी असल्याने पूल पाण्याखाली जात आहे. पुलावर पाणी आल्याने नदीच्या पलीकडील सडे, शिंगवे यागावातील नागरिकांचा वारीशी संपर्क तुटला आहे. पुलावर पाणी असतानाही काही नागरीक आपला जीव धोक्यात घालून संरक्षक कठडे नसलेल्या या पुलावरून जीवघेणा प्रवास करण्याचे धाडस करीत होते. दरम्यान यंदाच्या संपूर्ण पावसाळ्यात वारीचा पूल दुसऱ्यांदा पाण्याखाली गेला आहे.