राहुरी : दक्षिण नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या मुळा धरण भरण्याच्या मार्गावर आहे. पाणलोटात सुरू असलेल्या पावसाने मुळा धरणात रविवारी (२३ आॅगस्ट) संध्याकाळी २२ हजार ८१२ दशलक्ष घनफूट पाण्याची नोंद झाली आहे. यामुळे धरण ८८ टक्के भरले आहे. दरम्यान धरणातून नदीपात्रातून पाणी सोडण्याची तयारी पाटबंधारे विभागाने सुरू केली आहे.
२६ हजार दशलक्ष घनफूट क्षमता असलेल्या धरणात सध्या २३ हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे. पाणलोटात पाऊस सुरू असल्याने धरणात ६ हजार २६० क्युसेकने आवक सुरू आहे.
रविवारी पाणलोट व लाभक्षेत्रावर सूर्यदर्शन झाले. पाणलोट क्षेत्रावर रिमझिम पावसाने हजेरी लावली. मुळा धरणातून पाणी सोडण्यासाठी गेटची सर्विसिंग करण्यात आली. लवकरच गेटच्या परिसरात लाइटिंग यंत्रणा कार्यान्वयित करण्यात येणार आहे. मुळा धरणावरील सायन दुरुस्ती करण्यात आली. नदीकाठी असणा-या नागरिकांना लवकरच सावधानतेचा इशारा देण्यात येणार आहे.
मुळा धरणात २५ हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाल्यानंतर जिल्हाधिकारी व तहसीलदारांना पाटबंधारे खात्याच्या त्याच्या वतीने इशारा पत्र देण्यात येणार आहे. २५ हजार ४०० दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाल्यानंतर नदीपात्रात पाणी सोडण्याचा नियम आहे. २८ आॅगस्ट दरम्यान तांत्रिकदृष्ट्या मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे.