अहमदनगर : गणरायाच्या आगमनाबरोबर कमी-अधिक प्रमाणात पावसाला सुरूवात झाल्याने शेतकºयांच्या आशा पल्लवित होऊ लागल्या आहेत. बुधवारी सायंकाळी नगर शहरासह नेवासा, पारनेर, श्रीगोंदा व कर्जत तालुक्यांत समाधानकारक पावसाने हजेरी लावली.पावसाळ्याचे सुरूवातीचे साडेतीन महिने कोरडे गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. पुरेशा पावसाअभावी खरीप हंगामातील पिके धोक्यात आली असून, उत्पादनात घट होण्याची शक्यता असताना आता रबीसाठी तरी पाऊस पडावा, अशी प्रार्थना शेतकरी गणरायाकडे करत आहेत. तीन दिवसांपासून जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. बुधवारी नेवासा तालुक्यातील सलाबतपूर (१७), कुकाणा (३), चांदा (२८), घोडेगाव (१९), बडाळा बहिरोबा (७४), सोनई (१६), नगर तालुक्यातील नगर (१४), केडगाव (२१), चास (२३), भिंगार (२८), वाळकी (३७), चिंचोडी पाटील (८), सावेडी (२८), पारनेर तालुक्यातील पारनेर (१७), सुपा (१२), निघोज (१५), वाडेगव्हाण (५२), श्रीगोंदा तालुक्यातील चिंभळा (२१), काष्टी (२१), बेलवंडी (३५), देवदैठण (२३), कोळगाव (२६), तर कर्जत तालुक्यातील कर्जत (१४), कोंभळी (१९), माही (१५), मिरजगाव (३१) वांबोरी (३०) आदी ठिकाणी समाधानकारक पाऊस झाला. पाथर्डी, शेवगाव, जामखेड, श्रीरामपूर, राहुरी व राहाता या तालुक्यांत मात्र बुधवारच्या पावसाने पाठ फिरवली.शेतक-यांचे परतीच्या पावसाकडे डोळे४जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या ६६ टक्के पाऊस झाला असला तरी अकोले तालुका वगळता इतर तालुक्यांत पावसाचे प्रमाण कमी आहे. शेतक-यांच्या सर्व आशा आता परतीच्या पावसाकडे लागल्या आहेत. उत्तरेतील मुळा, भंडारदरा, निळवंडे हे मोठे प्रकल्प वगळता जिल्ह्यातील इतर ठिकाणची धरणे, तलाव, बंधारे अद्याप कोरडेच आहेत.
पाच तालुुक्यांत पावसाची हजेरी : आतापर्यत सरासरी ६६ टक्के पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 11:20 AM