लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : नगर शहरासह जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंद्यासह इतर तालुक्यांत शुक्रवारी रात्री सोसाट्याचा वारा, विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने तडाखा दिला. अचानक आलेल्या पावसाने शेतात साठवलेला कांदा झाकून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची धांंदल उडाली.
काही ठिकाणी पावसामुळे कांदा भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. चार दिवस पावसाचे वातावरण राहील, असा इशारा हवामान विभागाने तीन दिवसांपूर्वीच दिला होता. त्यानुसार वातावरणातील उष्मा वाढला होता तसेच वातावरणात अचानक बदलही दिसून येत होता. मात्र, मागील दोन दिवसांत नगर शहरातील काही परिसरवगळता कुठेही फारसा पाऊस झाला नव्हता. बोल्हेगाव, एमआयडीसी परिसरात गुरुवारी सकाळी हलक्या सरी कोसळल्या होत्या. शुक्रवारी सकाळपासूनच उन्हाचा चटका जाणवत होता. सायंकाळी चारच्या सुमारास पारनेर, श्रीगोंदा, नेवासा आदी तालुक्यांमध्ये काहीसे ढगाळ वातावरण झाले होते. त्यानंतर अचानक सोसाट्याचा वारा सुटला. विजांचा कडकडाटही सुरू झाला. वारा इतका वेगात होता की सर्वत्र धुळीचे साम्राज्य होते. रात्री आठ ते दहाच्या सुमारास पारनेर तालुक्यातील कजुर्ले हर्या गावासह परिसरात विजांच्या कडकटासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांची कांदा झाकण्यासाठी धावपळ सुरू झाली होती. वातावरण बदलामुळे काही भागांत शेतकऱ्यांनी कांदा झाकण्यासाठी प्लास्टिक कागद खरेदीसाठी दिवसभर दुकानांमध्ये गर्दी केली होती.तसेच नगर शहर परिसरातही रात्री नऊच्यानंतर जोरदार वाऱ्यासह विजांच्या कडकटात अवकाळी पाऊस झाला.वारा सुटताच वीज गायब..अगोदरच कोणत्याही वेळी विजेचे भारनियम सुरू आहे. त्यातच रात्री विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा सुरू होताच नगर शहरासह जिल्ह्यातील बहुसंख्य भागात अचानक वीज गायब झाली होती.