अहमदनगर : नगर शहरासह शेवगाव, नेवासा तालुक्यांत शनिवारी रात्री जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यातही सर्वच तालुक्यांत कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला. रविवारीही दिवसभर ढगाळ वातावरण होते. अधूनमधून रिमझिम पाऊसही झाला.
बंगालच्या उपसागरात हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. यातून गुलाब चक्रीवादळ तयार झाले आहे. या चक्रीवादळामुळे राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली होती. त्यानुसार शनिवारी नगर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या ११० टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्याच्या पावसाची सरासरी ४४८ मि.मी. आहे. या सरासरीपेक्षा जास्त ५२८ मि.मी. इतका म्हणजे ११७.९ टक्के पाऊस झाला आहे. शनिवारी जिल्ह्यात झालेला पाऊस मि.मी.मध्ये असा आहे. नगर (१८.४), पारनेर (५.९), श्रीगोंदा (९.७), कर्जत (२०.३), जामखेड (२८.२), शेवगाव (४४.२), पाथर्डी (२७.८), नेवासा (२८.८), राहुरी (१०.८), संगमनेर (०.४), अकोले (१.९), कोपरगाव (१२.२), राहाता (१.५). एका दिवसातच जिल्ह्यात झालेल्या पावसाची ही सरासरी १४.५ मि.मी. इतकी होती.
----
जिल्ह्यातही ऑरेंज अलर्ट
हवामान खात्याने राज्यातही मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. अहमदनगर जिल्ह्यात सोमवारी ‘यलो अलर्ट’ म्हणजे विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस मात्र काही भागातच हा पाऊस होईल. मंगळवारी मात्र जिल्हा ‘ऑरेंज अलर्ट’मध्ये दाखविला आहे. यामध्ये जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टीची शक्यता व्यक्त केली आहे. त्यानंतरही दोन दिवस पावसाचा मुक्काम राहणार आहे.