राहुरी : दक्षिण अहमदनगर जिल्ह्याचे जीवनदायीनी असलेल्या मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पाऊस रूसल्याने शेतक-यांचे लक्ष पाण्याच्या पातळीकडे वेधले आहे. लाभक्षेत्रावर पावसाने समाधानकारक हजेरी लावली असून धरणात पिण्यायोग्य पाणी केवळ २६७ दलघफु इतका आहे. २६ हजार दलघफु पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात सध्या ४ हजार ८६८ दलघफु पाणी साठा आहे. त्यापैकी ४ हजार ५०० दलघफु पाणीसाठा मृत आहे. परवा कोतुळ येथे १० मिली पावसाची नोंद झाली. धरणाकडे पाण्याची आवक सुरू होण्यासाठी पाणलोट क्षेत्रावर जोरदार पावसाची गरज निर्माण झाली आहे. पाणलोट क्षेत्रावर पावसाने विश्रांती घेतल्याने नव्याने पाण्याची आवक सुरू झालेली नाही. मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पावसाने आंगठा दाखविला असला तरी लाभ क्षेत्रावर पावसाने सुरूवात केली आहे. त्यामुळे पेरण्या सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. नेवासा, राहुरी, वडाळा, खडका आदी ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. याउलट शिरसागाव, कु काणा, दहेगाव आदी भागात पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे श्ोतक-यांचे लक्ष आभाळाकडे वेधले आहे.‘‘मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पावसाने विश्रांती घेतल्याने नव्याने पाण्याची आवक सुरू होऊ शकलेली नाही. नजीकच्या काळात धरणावर पावसाची हजेरी अपेक्षीत आहे. मात्र लाभ क्षेत्रावर पावसाने ब-यापैकी हजेरी लावली आहे. लाभक्षेत्रावर ६० मिली पाऊस पडला आहे. नजिकच्या काळात पाऊस आणखी सक्रीय होण्याची अपेक्षा आहे़ धरणात पिण्यायोग्य २६७ दलघफु पाणी साठा उपलब्ध आहे.’’- रावसाहेब मोरे, कार्यकारी अभियंता मुळा पाटबंधारे विभाग, अहमदनगर‘‘शेतातील पीके यंदा जोमदार आहेत. ऊसाचे क्षेत्र समाधानकारक आहे. मात्र मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पावसाने हजेरी लावलेली नाही. ऊसाचे भवितव्य मुळा धरणाच्या पाण्यावर अवलंबुन आहे. यंदा मुळा धरण पुर्ण क्षमतेने भरले तरच शेतक-यांना दिलासा मिळणार आहे. मुळा डावा कालव्याखाली असलेल्या मुसळवाडी तलावात केवळ २० टक्के पाणी साठा आहे.’ - अनिल इंगळे, शेतकरी