अहमदनगर: धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने, नव्याने मुळा धरणात गुरुवारी १६० दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली. अनेक वर्षांनंतर जून महिन्यातच मुळा धरणात नवीन पाण्याची आवक झाल्याने शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
यंदा पावसाने जून महिन्यातच जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यात सर्वदूर पाऊस पडल्याने खरिपाची पेरणी सुरू आहे. मुळा धरणातून सुरू असलेले उन्हाळी आवर्तन १० जून रोजी बंद करण्यात आले. मुळा धरणात सध्या ६ हजार ७७५ दशलक्ष घनफूटपाणीसाठा आहे.
नवीन पाण्याची आवक जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू झाली आहे. पाण्याची आवक सुरू झाल्याने पाटबंधारे विभागाने दरवाजांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.
मुळा धरणाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी मुळा धरणाची पाहणी केली. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत धरणातील पाण्याचे जलपूजन केले. आवर्तन बंद करण्यात आले आहे. पावसाचे पाणी कालव्यात सोडले जात आहे, असे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी सांगितले.