शेवगाव : सर्वसामान्यांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी आयुष्यभर संघर्ष केला. त्याच पद्धतीची कामगिरी करुन गोरगरीबांच्या हृदयात अढळ स्थान पटकाविणाऱ्या पद्मभूषण बाळासाहेब विखे यांच्या वारसास यंदाच्या लोकसभेसाठी महायुतीने संधी दिली. वारसा चालविणे हे सतीचे वाण असल्याचा अनुभव आपण घेतलेला आहे. त्यामुळे विकासाचा वारसा चालविण्याची क्षमता असलेल्या डॉ. सुजय विखे यांना या परिसरातील जनेतेने साथ व सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी शनिवारी येथे केले.अहमदनगर लोकसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारार्थ शेवगाव येथील सभेत त्या बोलत होत्या. आमदार मोनिका राजळे अध्यक्षस्थानी होत्या.मुंडे म्हणाल्या, आपण या परिसरातील विकास कामासाठी सर्वाधिक निधी दिला आहे. जनतेने आपल्या शब्दाला सतत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यंदाच्या निवडणुकीतही या परिसरातून आपल्या भगिनी प्रितम मुंडे यांच्यापेक्षा मोठे मताधिक्य देऊन महायुतीच्या विजयात आपले सर्वाधिक योगदान ठळकपणे नोंदवावे. सामान्य मनुष्याची काळजी घेणाºया केंद्र व राज्यातील सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे प्रत्येक प्रश्नाला दिलासा देण्याचे काम झाले आहे. त्यामुळे लोकशाहीचे सैनिक असलेल्या मतदारांनी विकासाचे अधिकाअधिक संरक्षण होण्यासाठी महायुतीमागे आपली संघटित शक्ती उभी करावी. सामान्य मनुष्यास न्याय व प्रतिष्ठा प्राप्त करून देणाºया मोदी सरकारला साथ देऊन ‘फिर एक बार मोदी सरकार’ हे घोषवाक्य सत्यात उतरविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.आमदार मोनिका राजळे यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या सहकार्यातून शेवगाव-पाथर्डी मतदार संघात विविध विकास कामे झाल्याने जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. दुष्काळी भागातील पाटपाण्याच्या समस्या, मिनी आद्योगिक वसाहत, मुळा धरणाचे पाणी लाड जळगावपर्यंत पोहोचवून दुष्काळी परिसराला सुजय विखे न्याय देतील, असा विश्वास व्यक्त केला. आपली स्वत:ची निवडणूक असल्याप्रमाणे प्रचाराला वेग दिल्याने मतदार संघात या परिसरातून महायुतीला सर्वाधिक मताधिक्य मिळेल, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.