संगमनेर : केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकरी संघर्ष करीत आहेत. हे कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या आंदोलनात आतापर्यंत ६० हून अधिक शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला आहे. तरीही केंद्रातील असंवेदनशील सरकारला अजून जाग आलेली नाही. या निर्दयी, अहंकारी मोदी सरकारला जागे करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते शनिवारी (दि. १६) नागपूर येथील राजभवनला घेराव घालणार आहेत. अशी माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी येथे दिली.
थोरात म्हणाले, केंद्रातील मोदी सरकार निवडक उद्योगपतींच्या हितासाठी काम करत असून या सरकारला देशातील गोरगरीब जनता शेतकरी, कामगार यांचे काही देणे घेणे नाही. केंद्र सरकारने संसदेच्या नियमांना पायदळी तुडवून आणलेले तीन काळे कृषी कायदे शेतकऱ्यांना उद्धवस्त करणारे आहेत. भांडवलदारांच्या हिताचे कायदे तात्काळ रद्द करावेत, ही शेतकऱ्यांची भूमिका योग्य आहे.
एकीकडे शेतकरी, कामगार उद्ध्वस्त होत असताना दुसरीकडे इंधन दरवाढ करून सामान्य जनतेलाही लूट सुरू आहे. कृषी कायदे रद्द करावेत आणि पेट्रोल-डिझेलची दरवाढ त्वरीत मागे घ्यावी, या मागणीसाठी नागपूर येथे आंदोलन होत आहे, असेही थोरात यांनी सांगितले.