आढळगाव :
साखर कारखानदारांचे वर्चस्व असलेल्या जिल्ह्यात राज ठाकरे यांच्या प्रेरणेने आम्ही काम करत आहोत. श्रीगोंदा तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींवर मनसेचा झेंडा फडकावला असल्यामुळे आम्हाला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट मिळावी, अशी विनंती शर्मिला ठाकरे यांना मनसेचे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अतुल कोठारे यांनी फेसबुकवरून केली. त्यांना प्रतिसाद देत राज ठाकरे यांनी ढोरजा आणि बांगर्डा ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना वेळ देऊन ग्रामविकासाचा मंत्र दिला.
श्रीगोंदा तालुक्यातील ढोरजा ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी निवडीमध्ये मनसेचे तालुकाध्यक्ष अमोल कोहक यांच्या पत्नी छाया कोहक यांची सरपंचपदी तर जिल्हा उपाध्यक्ष संजय शेळके यांची बांगर्डा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संधी मिळाली. मनसेचे अन्य पदाधिकारीही ग्रामपंचायत सदस्य पदावर निवडून आले. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट मिळावी, अशी मागणी मनसेचे विद्यार्थ्यी सेनेचे तालुकाध्यक्ष अतुल कोठारे यांनी शर्मिला ठाकरे यांना फेसबुकवरून केली. त्यांनीही तत्काळ प्रतिसाद देत सोमवारी सकाळी भेटीची वेळ निश्चित केली.
मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संजय शेळके, तालुकाध्यक्ष अमोल कोहक, अतुल कोठारे, ढोरजा ग्रामपंचायत सदस्य अनिल वाणी, अनिल टकले, रजनिकांत कोठारे, सचिन गावडे, संदीप ठवाळ आदींनी राज ठाकरे यांची भेट घेतली.
ठाकरे यांनी मनसेचे प्रवक्ते अनिल शिदोरे यांच्यावर या ग्रामपंचायतींची जबाबदारी सोपवली असून, ढोरजा आणि बांगर्डा या दोन्ही गावांच्या विकासाची ब्लू प्रिंट तयार करण्यास सांगितले. गावाच्या विकासासाठी कसलीही अडचण आल्यास थेट संपर्क साधण्याचा कानमंत्र देऊन गावांमध्ये बदल घडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
फोटो १५ राज ठाकरे
मुंबई येथे श्रीगोंदा तालुक्यातील ढोरजा, बांगर्डा ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे.