शिर्डी : साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी शिर्डीत आलेल्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी आपला मराठी बाणा दाखवत उपस्थितांशी मराठीतच संवाद साधला. तसेच त्यांच्याशी हिंदीतून बोलण्याचा प्रयत्न करणा-या चंद्रशेखर कदम यांनाही मराठीतूनच बोलण्याचा सल्ला दिला. बाबांच्या दर्शनाने उर्जा मिळते, अशा शब्दात वसुंधरा राजे यांनी आपली साईबाबांवरील श्रद्धा व्यक्त केली.वसुंधरा राजे यांनी सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास साईदरबारी हजेरी लावली. साईसमाधीची पुजा केल्यानंतर त्यांनी सार्इंची आरतीही केली. यावेळी संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, प्रभारी मुख्यकार्यकारी अधिकारी धनंजय निकम, राहात्याच्या नगराध्यक्षा ममता पिपाडा, राजेंद्र पिपाडा, डॉ़ गाडेकर आदींची उपस्थिती होती.साईसमाधीच्या दर्शनानंतर वसुंधरा राजे यांनी गुरूस्थान व द्वारकामाई मंदीरातही दर्शन घेतले. यावेळी त्यांनी संस्थान व विविध कामांची माहिती जाणून घेतली. यावेळी कदम यांनी वसुंधरा राजे यांच्याशी हिंदीतून संवाद साधण्याचा प्रयत्न केला. ते पाहून राजे यांनी कदम यांना मराठीतूनच बोला असा सल्ला देत मराठीतच संवाद साधला.त्या म्हणाल्या, आपण लहानणी येत असू तेव्हा शिर्डी अगदी लहानसं खेडं होतं. पण आता ब-याच दिवसांनी येणं झालं. पूर्वी पाहिलेल्या या खेड्याचं आता शहरात रुपांतर झालं आहे. मंदीर परिसरातही खूप चांगले बदल झाले आहेत. हे बघुन समाधान वाटते. आपण आज साईदर्शनासाठी आलो असून राजकीय काहीही बोलणार नाही, असे सांगत त्यांनी अन्य विषयांवर बोलणे टाळले.
राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे म्हणाल्या मराठीतच बोला; शिर्डीत येऊन घेतले सार्इंचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 6:26 PM