अभियंता दिन/संडे मुलाखत/
चंद्रकांत शेळके/अहमदनगर : आधुनिक भारतातील अभियंत्यांचे प्रेरणास्थान डॉ. मोक्षगुण्डम विश्वेश्वरैया यांचा जन्मदिवस (१५ सप्टेंबर) भारतात अभियंता दिन म्हणून साजरा होतो. या पार्श्वभूमीवर अभियंत्यांचे देशप्रगतीतील योगदान, अभियांत्रिकीकडे विद्यार्थ्यांचा पाहण्याचा दृष्टीकोन, भविष्यात अभियांत्रिकीसमोरील आव्हाने, बदल अशा सर्वच बाजूंनी नेप्ती येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजकुमार देशपांडे यांच्याशी साधलेला हा संवाद.अभियांत्रिकीमुळे समाजाची, देशाची प्रगती कशी साधली जाते?आज भारताने या बाबतीत बराच मोठा पल्ला गाठला आहे. भारताची यशस्वी मंगळ मोहीम हे त्याचेच एक उदाहरण आहे. पहिल्याच प्रयत्नात मंगळ मोहीम फत्ते करणारा भारत हा आशिया खंडातील पहिला देश ठरला, कारण येथील अभियंते कौशल्यपूर्ण आहेत. उपग्रहांच्या आधारे चालणारी जीपीएस सिस्टिम भारताने विकसीत केली असून यासाठी भारताला आता गुगलवर अवलंबून राहण्याची गरज नाही. हे सर्व भारताच्या प्रगतीतील मैलाचे दगड आहेत.सध्या भारतात अभियंत्यांची स्थिती कशी आहे?सध्या भारतातून अनेक अभियंते दरवर्षी पदव्या घेऊन बाहेर पडतात. परंतु आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात अभियंत्यांचे फक्त पुस्तकी ज्ञान उपयोगी पडणार नसून त्यास प्रात्यक्षिकाची आणि त्याहूनही अधिक महत्वाचे म्हणजे कौशल्याची जोड देणे गरजेचे आहे. गेल्या काही वर्षात अभियांत्रिकीची ध्येयधोरणे कशी राहिली?भारताने गेल्या काही वर्षात आखलेली ध्येयधोरणे ही परदेशातही वाखाणली गेली आहेत. डिजिटल इंडिया, स्मार्ट सिटी प्रकल्प, मेक ईन इंडिया, ई-क्रांती, ई-गव्हर्नन्स, डिजिटल लॉकर, स्टार्ट अप हे काही महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहेत. त्यातून नक्कीच देशप्रगतीत हातभार लागेल.अभियांत्रिकी समोरील आव्हाने कोणती? अभियांत्रिकी शिक्षणपद्धतीत बदल आवश्यक आहेत का?खरं तर अभियंते हे देशसेवकच आहेत. देशापुढील समस्या, आव्हानांचा सामना करण्यासाठी त्यांनी त्यांचे कौशल्य वापरायला हवे. नैसर्गिक आपत्तीत उपाययोजना करणे, इंधनाचे मर्यादित स्त्रोत लक्षात घेता अपारंपरिक उर्जा स्त्रोताचा वापर, प्रदूषण नियंत्रण, भूकंपरोधक घरे असा सामाजिक प्रश्नांचा अभ्यास, त्यावर उपाययोजना करणे ही काही आव्हाने अभियंत्यांसमोर आहेत. कौशल्य हा यशस्वी इंजिनिअर्सचा मूलमंत्र आहे. ‘प्रॉब्लेम बेस्ड लर्निंग’, स्किलबेस्ड इंजिनिअरिंग, इंडस्ट्री ओरिएंटेड लर्निंग यावर यापुढील काळात शिक्षणसंस्थांनी विचार करणे गरजेचे आहे.