जामखेड - पंचायत समिती सभापती पदासाठी स्थगित असलेली मतमोजणी प्रक्रिया होऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजश्री मोरे व भाजपच्या मनिषा सुरवसे यांना समसमान मते मिळाली यावेळी चिठ्ठीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजश्री मोरे ह्या नशीबवान ठरल्या दहा महिन्यानंतर रिक्त सभापती पदाला न्याय मिळाला आहे.
जामखेड पंचायत समिती सभापती पदासाठी ३ जुलै रोजी प्रक्रिया झाली होती पण उच्च न्यायालयाने मतमोजणी करण्यास स्थगिती दिली होती. सदर स्थगिती उठल्यानंतर गुरुवार दि. १५ रोजी पंचायत समिती सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी अकराच्या सुमारास बैठक सुरू झाली यावेळी मतमोजणी करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजश्री मोरे व भाजपच्या मनीषा सुरवसे यांना समसमान मते मिळाली त्यामुळे चिठ्ठीवर निवड करण्याचे निवडणूक अधिकारी नष्टे यांनी जाहीर केले.
इयत्ता ५ वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या वैष्णवी रमेश जगदाळे हिने बॉक्स मधून चिठ्ठी काढली असता ती राजश्री मोरे यांची निघाली निवडणूक अधिकारी यांनी राजश्री मोरे यांची निवड जाहीर करताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला व मोठय़ा प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी केली आमदार रोहित पवार हे पंचायत समितीत येऊन त्यांनी नवनिर्वाचित सभापती राजश्री मोरे यांचा सत्कार केला.