तिसगाव : पाथर्डी तालुक्यातील मांडवे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राजूआप्पा लवांडे यांची निवड झाली. उपसरपंचपदी मनीषा पुंजाराम शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
दोन पारंपरिक गटात लढती होऊन एका गटाला सहा तर दुसऱ्या गटाला तीन जागा मिळाल्या. सरपंचपद खुले निघाले. त्यामुळे स्पर्धा वाढली. ग्रामपंचायत सदस्य सहलीवर गेले होते. तिकडे चुरस शिगेला गेली. सहल संपली. अखेरच्या क्षणी सरपंचपदासाठी शिवाजी लवांडे व राजू लवांडे यांचे दोन अर्ज आले. गुप्त मतदान घेण्यात आले. त्यात राजू लवांडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. निवडणूक निर्णय अधिकारी दादासाहेब शेळके यांनी निवडीची घोषणा केली.
नूतन ग्रामपंचायत सदस्य अशोक वाघचौरे, रामदास भापसे, मंदाबाई जनार्धन लवांडे, जनाबाई जगन्नाथ नजन, निर्मला विष्णू पाटोळे आदी हजर होते. विधिज्ञ गणेश लवांडे, ज्येष्ठ नागरिक मधुकर लवांडे, रामनाथ लवांडे आदींनी नूतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान केला. यापूर्वी सलग पंचवीस वर्षे सदस्य म्हणून कामकाज केले आहे. त्यामुळे ग्रामविकासाचा अनुभव पाठीशी आहे. सरपंच म्हणून काम करताना या अनुभवाचा सुयोग्य वापर करू, असे लवांडे यांनी सांगितले. ग्रामसेवक भाऊसाहेब सावंत यांनी आभार मानले.