श्रीरामपूर : शेजारच्या राज्यातून होणारा दूध पुरवठा आपण कोणत्याही परिस्थितीत अडविणार आहोत. हार्दिक पटेल यांनी आंदोलनास पाठिंबा देत गुजरातमधून दूध बाहेर पडू देणार नसल्याचे आश्वासन दिले आहे. शेतकऱ्यांनी केवळ सहा दिवस साथ दिली, तर सरकारला गुडघे टेकायला भाग पाडू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिला.कारेगाव येथे दूध दरवाढ आंदोलनाच्या तयारीसाठी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. ज्येष्ठ नेते दशरथ सावंत, घनश्याम चौधरी, माणिक कदम, देवेंद्र भुयार, हंसराज वडगुळे, गजानन बंगाळे, अंबादास कोरडे, सुभाष पटारे, सुरेश ताके, जितेंद्र भोसले आदी उपस्थित होते.केंद्रिय कृषिमंत्री शेतकºयांना सेंद्रिय शेती करण्याचे व देशी जनावरे पाळण्याचे सल्ले देतात. मात्र अतिरिक्त उत्पादन झालेली दुधाची पावडर व बटरबाबत निर्णय घेण्याची सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष करतात. दूध निर्यातीस कुठल्याही प्रकारचा वाव नाही. त्यामुळे निर्यातीला अनुदान देऊन उपयोग होणार नाही. राज्य सरकारने बाजारात हस्तक्षेप करावा. अतिरिक्त उत्पादित झालेले दूध महानंदतर्फे २७ रूपये लीटर दराने खरेदी करायला हवे. पर्यायाने शेतकºयांना वाढीव दर देता येईल, असे शेट्टी म्हणाले.यावेळी सावंत यांनीही सरकारवर सडकून टीका केली.
सरकारी तिजोरीवर संघटित दरोडा
सरकार विनय कोरे यांच्यासारख्या लोकांना पॅके जच्या माध्यमातून फायदा पोहोचवित आहेत. सरकारी तिजोरीवर संघटित दरोडा टाकला जात आहे, असा आरोप त्यांनी केला.
गोहत्याबंदीमुळे शेतक-यांचे नुकसान
गोहत्याबंदी करून भाकड जनावरे सांभाळण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्य हे गोरक्षकांची पाठराखण करतात. मुख्यमंत्री फडणवीस हेदेखील यात मागे नाही. नागपूर येथे काही महिलांनी विरोध करताच बोकडांची होणारी निर्यात थांबवतात. यामुळे शेतकºयांचे आर्थिक नुकसान झाले. गाईमध्ये बत्तीस कोटी देव असल्याचा कांगावा केला जात असल्याचे सांगून त्याचाही शेट्टी यांनी समाचार घेतला.