राहुरी : दूधाला रास्त भाव मिळावा, या मागणीसाठी राहुरी येथील अहमदनगर - मनमाड राष्ट्रीय मार्गावर रास्तोरोको आंदोलन छेडण्यात आले. शिवसेना जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रविंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात शासनाचा निषेध व्यक्त करीत आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला.आंदोलकांच्या वतीने तहसीलदार अनिल दौंडे यांना दूध भाव वाढीसंदर्भात निवेदन सादर केले. आंदोलकांसमोर बोलतांना शिवसेना जिल्हा अध्यक्ष रावसाहेब खेवरे म्हणाले, उत्पादन खर्च वाढत असतांना दूध स्वस्तात विकले जात आहे. मात्र शासनाने दूधाच्या भावात वाढ न केल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. शासनाने दूधाला त्वरीत भाव वाढून द्यावा अन्यथा आंदोलन तीव्र केले जाईल. पशु आहार व औषधांच्या किंमतीमध्ये वाढ होत असतांना दुधाचे भाव कमी का? असा सवाल रावसाहेब खेवरे यांनी केला.इंग्रजांपेक्षाही भाजप सरकार धोकादायक आहे. जाणूनबुजून आंदोलकांवर गुन्हे दाखल करीत आहेत़ माझ्यावर तीन गुन्हे दाखल केले असून रास्त भावासाठी कधीही झुकणार नसल्याचे रविंद्र मोरे यांनी सांगितले. शासनाच्या दडपशाहीचा मोरे यांनी तीव्र शब्दात निशेध केला. आंदोलनाला मनसेच्या वतीने ज्ञानेश्वर गाडे यांनी तर आरपीआयच्यावतीने बाळासाहेब जाधव यांनी पाठींबा जाहीर केला.आंदोलकांसमोर प्रकाश देठे, ज्ञानेश्वर गाडे यांची भाषणे झाली़ पोलिस उपविभागीय आधिकारी सोमनाथ वाकचौरे, पोलिस निरीक्षक अविनाश शेळीमकर यांनी पोलिस बंदोबस्त ठेवला होता़ यावेळी अनिल इंगळे, सतीश पवार, अरूण डौले, सुनिल इंगळे, प्रमोद पवार, विशाल तारडे, अशोक कदम, पांडू उदावंत, पोपट शिरसाट, अशोक तुपे आदी उपस्थित होते.