राळेगणसिद्धी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे सातव्या दिवशीही दिल्लीत उपोषण सुरू असून सरकार अण्णांच्या मागण्यांसदर्भात गांभीर्याने विचार करीत नाही. त्यामुळे राळेगणसिद्धीतील ग्रामस्थांनी आत्मदहनाचा निर्णय घेतला आहे. गावात मोठ्या प्रमाणात लाकडे आणली जात आहेत. अकरा वाजता ग्रामस्थ सामूहिक आत्मदहन करणार आहेत. दरम्यान शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांना गावबंदी केल्यानंतर गावात पोलिसांसह एकही शासकीय कर्मचारी उपस्थित नाही.
नगर-कल्याण महामार्गावरील टाकळी ढोकेश्वर (ता. पारनेर) येथे सकाळी सुमारे एक तास रास्ता रोको करण्यात आला. वासुंदे चौकात हा रास्ता रोको करण्यात आला. त्यामुळे महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या़ कार्यकर्त्यांनी महामार्गावरच ठिय्या देत वाहतूक अडविली. सरकार अण्णांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला. सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
अण्णा हजारे यांची प्रकृती खालावत असल्यामुळे पारनेर तालुक्यात गुरुवारी सकाळपासून विविध ठिकाणी आंदोलने सुरु करण्यात आली आहेत. सुपा येथे नगर-पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरु करण्यात आले आहे. जवळे, पानोली, नगर-कल्याण रोडवर टाकळी-ढोकेश्वर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे.
सुपा येथे निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली नगर-पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरु करण्यात आले आहे. या रास्तारोको आंदोलनामुळे महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दरम्यान राळेगणसिद्धी ग्रामस्थांनी बुधवारी शासकीयकर्मचारी, अधिका-यांना गावबंदी केल्यामुळे आज, गुरुवारी राळेगणसिद्धीत एकही शासकीय कर्मचारी किंवा अधिकारी फिरकला नाही. अण्णांच्या संरक्षणासाठी नेमण्यात आलेले पोलिसही राळेगणसिद्धीत उपस्थित नाहीत.