तिसगाव : वृक्ष लागवड संवर्धन, अंधश्रद्धा निर्मूलन, मतदानाची टक्केवारी वाढविणे, सेंद्रिय शेतीची जोपासना करणे, यावर मच्छिंद्रनाथ गडावर नाथभक्तांच्या तपपूर्ती दसरा मेळाव्यात सार्वत्रिक विचारमंथन झाले. मायंबा मेळावा हा जातीपातींच्या कक्षा उल्लंघून संत विचारांचा सदभावना मंच व्हावा, अशी अपेक्षा ही उपस्थित साधू, संत, कीर्तनकार यांनी याप्रसंगी व्यक्त केली.पंढरपूर येथील रामदास महाराज जाधव अध्यक्षस्थानी होते. विश्वस्त व विधानपरिषद सदस्य सुरेश धस, माजी आमदार साहेबराव दरेकर, राष्ट्रसंत बद्रीनाथ तनपुरे, बबन महाराज बहिरवाल, छगन महाराज मालुसरे, पंढरीनाथ उंबरेकर, अशोक महाराज मरकड, हंसराज मगर, बापूसाहेब भोसले, मुरलीधर देशमाने, डॉ.सय्यद व्यासपीठावर होते. बद्रिनाथ महाराज तनपुरे म्हणाले, वारकरी संप्रदायाला नाथ संप्रदायाचे विस्तारीत रूप मानले गेले आहे. माणुसकी जपतानाच जातीच्या विरहीत माणसे जोडण्यांसह ती जपण्याची सर्वांगीण कृती झाली पाहिजे. माणसे जोडली गेली की अखंड भारताची स्वप्नपूर्ती सत्यात येऊ शकेल. ती मानवतेची कृती मायंबा मेळाव्यातून सजीव व्हावी. डॉ.समीर सय्यद म्हणाले, संगणकाच्या युगात गरज असताना व अवयवांचे प्रत्यारोपण करताना रक्ताची गरज असताना जात, धर्म, पंथ यांचा विचारही मनाला शिवत नाही. तीच सद्भावना व तोच वैचारिक काला मायंबाचे पवित्र स्थळावरून जगासमोर जावा. रामदास महाराज जाधव यांनी संत सावता महाराज यांचे कांदा, मुळा, भाजी, अवघी विठाई माझी.. हा सर्वांभूती परमेश्वर पाहण्याचा संदेश अध्यक्षीय भाषणात सांगितला. माजी आमदार दरेकर यांनी मतदानाची घटती टक्केवारी ईव्हीएम मशीन त्रुटी यावर नेटके भाष्य केले. देवस्थानचे अध्यक्ष दादासाहेब चितळे, सचिव बाबासाहेब म्हस्के यांनी स्वागत केले. प्रास्ताविक आमदार सुरेश धस यांनी केले. सरपंच राजेंद्र म्हस्के यांनी आभार मानले.
मायंबा गडावरील मेळावा संत विचारांचा सद्भावना मंच व्हावा; साधू-संतांचे मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2019 1:05 PM