केडगाव : तालुक्यातील ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या चिचोंडी पाटील गावामध्ये रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर आणि कोरोना रोगाच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने, शासकीय नियमांचे पालन करून, प्रत्येकाने सॅनिटायझर व मास्कचा वापर करून, मोजक्या प्रमुख लोकांच्या उपस्थितीत, जामा मशीद येथे शांतता बैठक घेण्यात आली. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर मशिदीमध्ये नमाज पठण न करता घरातच नमाज अदा करावी, असे आवाहन नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी केले.
सानप म्हणाले, योग्य कारणाशिवाय घराबाहेर पडू नका, शक्यतो घराबाहेर जाण्याचे टाळावे, प्रत्येकाने मास्कचा वापर करावा, फिजिकल डिस्टन्स ठेवावा, आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. कोणतेही दुखणे अंगावर काढू नका. त्वरित आपल्या गावातील रुग्णालयांमध्ये दाखल व्हा. रमजान ईदसाठी जे साहित्य लागते, त्यासाठी पाच जणांची कमिटी स्थापन करून त्यांची कोरोना चाचणी करून त्यांच्यामार्फत साहित्य उपलब्ध करून घ्यावे. ही कमिटी साहित्यासाठी मदत करेल, असेही त्यांनी सांगितले.
राज्य अल्पसंख्याक अधिकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुस्तफा मनियार यांनी प्रास्ताविकात सामाजिक, जातीय सलोखा, एकात्मता, भाईचारा, शांतता ही इस्लामची तत्वे आहेत, त्यानुसार प्रत्येकाने आचरण करावे. इस्लामच्या आदर्श विचारांचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन केले.
याप्रसंगी फौजदार घोरपडे, गुप्तवार्ता विभागाचे रावसाहेब खेडकर, पो. ना. धर्मनाथ पालवे, पोलीस हवालदार अमिना शेख, पोलीसपाटील नीळकंठ खराडे, सामाजिक कार्यकर्ते जब्बार खान, अमीरसहाब सय्यद, मौलाना मोहम्मद सईद, मुसाभाई मनियार, महेमूद शेख, पत्रकार सोहेल मनियार, मुजाहिद मनियार, रफिक मनियार, हारून मनियार, जहांगीर मनियार, इमरान मनियार, फारुख मनियार, कादर शेख, अन्सार सय्यद, सय्यद वसीम, जिशान सय्यद, सलमान सय्यद, अजहर सय्यद, साजिद सय्यद, आरिफ शेख आदी उपस्थित होते.