अहमदनगर : शहरातील कचरा संकलन करणाऱ्या घंटागाडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वच्छता निरीक्षकांना दिलेले ॲप बंद पडले आहेत. त्यामुळे शहरातील घंटागाड्यांचा कारभार रामभरोसे सुरू असल्याचे समोर आले आहे.
महापालिकेने शहरातील घर ते घर कचरा संकलन करण्यासाठी अभिकर्ता संस्थेची नेमणूक केली आहे. अभिकर्ता संस्थेमार्फत कचरा संकलन केले जाते. महापालिकेचे एकूण क्षेत्रफळ १९.८७ चौरस किलाेमीटर इतके आहे. शहरातील कचरा घर ते घर संकलन करण्यासाठी ६४ घंटागाड्या आहेत. सुरुवातीला घंटागाड्यांवर जीपीएस प्रणाली बसवून स्वच्छता निरीक्षकांना ॲप देण्यात आले होे. ॲपमुळे प्रभागात काेणत्या क्रमांकाची घंटागाडी कुठे आहे, हे स्वच्छता निरीक्षकांना समजत होते. मात्र, हे ॲप सध्या बंद आहे. ॲप बंद असल्यामुळे घंटागाडी कुठे कचरा भरते, याची माहिती प्रभागासाठी नियुक्त केलेल्या स्वच्छता निरीक्षकांना मिळत नाही. नागिरकांनी तक्रार केल्यानंतरच स्वच्छता निरीक्षक अभिकर्ता संस्थेच्या पर्यवेक्षकांशी संपर्क करतात. त्यांना सांगून तक्रारीचा निपटरा करण्यास सांगितले जाते. महापालिकेत जीपीएस प्रणाली उपलब्ध नाही. बिलांच्या फाइलला मात्र जीपीएस प्रणालीच्या मॅपची प्रत जोडली जाते. त्याआधारे महापालिकेकडून अभिकर्ता संस्थेला बिल अदा केले जाते. महापालिकेच्या आरोग्य विभागातील संगणकावर ही प्रणाली नाही. मग देयकांच्या वेळी जीपीएस प्रणालीचे मॅप येतात कुठून, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
शहरात नवीन प्रभाग रचनेनुसार १७ प्रभाग आहेत. या प्रभागांत नियमित घंटागाड्या जात असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगितले जाते. असे असताना वेळेवर घंटागाडी येत नाही, अशा अनेक तक्रारी पालिकेत दाखल होत आहेत. या तक्रारींवर स्वच्छता निरीक्षकांकडून कार्यवाही होते. ही कार्यवाही करताना अभिकर्ता संस्थेच्या प्रतिनिधींशी चर्चा करावी लागते. ज्या भागातील तक्रारी आहेत, त्या भागात घंटागाडी पाठविण्याबाबत सांगितले जाते. पर्यवेक्षकाला सांगितल्यानंतर गाडी येते; पण पुन्हा दोन, कधी कधी चार- चार दिवस घंटागाडी वसाहतीत फिरकत नाही. ॲप नसल्यामुळे नागरिकांनाही ऑनलाइन तक्रारी करणे शक्य होत नाही.
...
शहरात दररोज निघणारा कचरा
१३० मेट्रिक टन
...
कचरा संकलन करण्यासाठी लागणाऱ्या गाड्या
६४
...
स्वच्छता निरीक्षकांना दिलेले ॲप बंद
कचरा संकलन करणाऱ्या वाहनांवर जीपीएस प्रणाली बसवून ते स्वच्छता निरीक्षकांच्या मोबाइलला ॲपद्वारे कनेक्ट करण्यात आले होते. त्यामुळे कोणत्या क्रमांकाची गाडी कुठल्या वसाहतीत आहे, याची माहिती स्वच्छता निरीक्षकांना एका क्लिकवर मिळत होती. मात्र, हे ॲपच सध्या बंद आहे. त्यामुळे घंटागाड्यांवर कुणाचेही नियंत्रण नाही.
.....
वेळेवर गाड्या येत नसल्याने कचरा रस्त्यावर
कचरा संकलन करणाऱ्या घंटागाड्या वेळेवर येत नाहीत, अशी नागरिकांची तक्रार आहे. काही भागांत ३ ते ४ दिवसांतून गाडी येते. त्यामुळे नाइलाजाने नागरिक कचरा रस्त्यावर टाकतात. त्यामुळे शहरात पुन्हा अस्वच्छता दिसू लागली आहे.
..
६० टक्के कचऱ्यावर प्रक्रिया
शहरातून दररोज १३० टन कचरा संकलन होतो. कचरा संकलन करून तो बुरूडगाव येथील कचरा डेपोत टाकला जातो. तिथे ६० टक्के सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया होते. उर्वरित कचरा बाजूला काढून ठेवला जातो.
...
कचऱ्याचे वजन खाजगी काट्यांवर
कचऱ्याचे मोजमाप करण्यासाठी डेपोच्या प्रवेशद्वारावर वजन काटा बसविणे प्रस्तावित आहे. मात्र, हे महापालिकेच्या आरोग्य विभागाने अद्याप वजन काटे बसविलेले नाही. खतप्रकल्प उभे राहतात. मग वजन काट्याचेच काम का रखडले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. महापालिकेचे स्वत:चे वजन काटे नसल्याने खासगी वजन काट्यांवर कचऱ्याचे वजन केले जात आहे.