श्रीरामपूर - येवला येथे अखंड हरिनाम सप्ताहासाठी निघालेले सराला बेट येथील महंत रामगिरी महाराज गोदावरीच्या पुराने वेढा दिल्याने बेटावरच अडकले. महाराजांनी प्रशासनावर खापर फोडत आपल्याला बोटीतून उतरवून दिल्याने निषेध केला. अखेर स्वत:च्याच बोटीने धोकादायकरित्या प्रवास करीत पुराचा वेढा पार केला. सोमवारी दुपारी घडलेल्या या प्रसंगामुळे महाराजांच्या भक्त परिवारातून संताप व्यक्त केला जात आहे. श्रीरामपूर व वैैजापूर तालुक्याच्या सीमेवर असलेल्या येथील सराला बेट येथे हा प्रकार घडला. गोदावरी नदीला सोडण्यात आलेल्या पावणे तीन लाख क्युसेक पाण्यामुळे बेटाला दोन्ही बाजूने पुराचा वेढा पडलेला आहे. त्यामुळे महंत रामगिरी हे भक्त परिवारासमवेत येथे रविवारपासूनच अडकलेले होते. त्यांनी प्रशासनावर सर्व खापर फोडले आहे.येवला तालुक्यातील तळवाडे येथे गंगागिरी महाराजांच्या १७२ वा अखंड हरिनाम सप्ताह सोमवारपासून सुरू झाला आहे. महाराजांचा नगर जिल्ह्यासह मराठवाड्यात लाखोंचा भक्त संप्रदाय आहे. या सप्ताहाकरिता राज्यातून लाखो भाविक आले आहेत. मात्र पुरात अडकल्यामुळे सप्ताहाच्या उद्घाटनाला जाण्यास महाराजांना मोठा उशीर झाला. प्रशासनाने आपल्याला बोटीतून उतरविले. कवडीचीही मदत केली नाही. त्यामुळे सप्ताहाला लवकर जाता आले नाही. या प्रकाराचा मी निषेध करतो, तसेच अशी घटना पुन्हा घडू नये, अशी संतप्त प्रतिक्रिया महंत रामगिरी यांनी व्यक्त केली. त्यांच्यासमवेत उपस्थित असलेल्या भक्तांनीही निषेध केला. मठाच्या स्वत:च्या बोटीतून भक्तांसमवेत धोकादायकरित्या पुराच्या पाण्यातून प्रवास करत महंत रामगिरी हे वैैजापूर तालुक्याच्या हद्दीत पोहोचले. प्रशासनाने मात्र आरोप फेटाळलेतहसीलदार प्रशांत पाटील यांना याबाबत विचारले असता, त्यांनी महंत रामगिरी यांचे सर्व आरोप फेटाळून लावले. प्रांताधिकारी तेजस चव्हाण, नायब तहसीलदार जयश्री गुंजाळ, पोलीस निरीक्षक व महसूलच्या कर्मचाºयांसह आपण बेटावर जाऊन महाराजांना सुखरूप सुरक्षितस्थळी येण्याची विनंती केली होती. मात्र मठातील गायी व भक्त परिवाराला सोडून आपल्याला येता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट सांगितले. त्यानंतरही आम्ही विनवणी केली. मात्र पुराचे पाणी वाढल्याने आमचा नाईलाज झाला. हा सर्व प्रकार जिल्हाधिकाºयांच्याही कानावर घातल्याचे ते म्हणाले. महंत रामगिरी यांचे शिष्य मधू महाराज यांनी सोमवारी ऐनवेळी हेलिकॉप्टरची परवानगी मागितली होती. मात्र ऐनवेळी ती देणे शक्य नव्हते. जिल्हाधिकारी हेलिकॉप्टरची व्यवस्था करणार होते. मात्र तत्पूर्वीच महाराजांनी स्वत:च्या बोटीतून प्रवास सुरू केला. मी एनडीआरएफची टीम तातडीने रवाना केली. ही टीम महाराजांच्या बोटीसोबतच होती. ते सुखरूप बोटीतून बाहेर पडेपर्यंत मोबाईलवर संपर्कात होतो.-प्रशांत पाटील, तहसीलदार, श्रीरामपूर.
पुराने वेढलेल्या सरला बेटातून रामगिरी महाराज अखेर बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2019 6:55 PM