महिला दिन विशेष
श्रीगोंदा : बालपणी सोसलेल्या यातना विवाहानंतर बदलतील. सुखाचे दिन येतील असे वाटले होते, पण विवाहानंतर पतीचे अवघ्या चार वर्षांनंतर अपघाती निधन झाले. पुन्हा आभाळ कोसळले. अशा परिस्थितीत म्हातारपिंप्री येथील सारिका संजय वाबळे यांना दोन लेकरांना बरोबर घेऊन कोळपेवाडीला माहेरी जावे लागले. सारिकाने तिथ मोलमजुरी करून अनिकेत, श्रीनाथला शिकविले. अनिकेत हा पोलीस झाला आणि श्रीनाथ हा स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे.
कोळपेवाडी येथील रावसाहेब राजुळे यांची कन्या सारिका व म्हातारपिंप्री येथील संजय वाबळे यांचा १६ एप्रिल, १९९५ रोजी विवाह झाला. सारिकाने बालपणी शाळेचे तोंड नावाला पाहिले. गरीब परिस्थितीची झुंज देणाऱ्या आईच्या खांद्याला खांदा लावून काम केले. त्या बालपणीची हौसमौज नशिबी आली नाही.
विवाहानंतर अनिकेत व श्रीनाथ ही दोन मुले झाली. पती दररोज खासगी प्रवाशी वाहतूक करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. त्यावेळी पैसे, सुख, समाधान अमाप होते. या सुखी संसारात अनिकेत व श्रीनाथ ही मुले झाली. मात्र, ढोकराईजवळ जीप अपघातात पती संजय वाबळे यांचे निधन झाले. वैवाहिक जीवनाची स्वप्न अवघ्या चार वर्षांत धुळीस मिळाली. सारिका यांना मदत करण्याऐवजी दुःखावर डागण्या देण्याचे काम सुरू झाले. भावकीने जमिनीचा तुकडाही दिला नाही. अशा परिस्थितीत हिंमत न हारता, सारिकाबाईंनी अनिकेत व श्रीनाथ यांना कुशीत घेऊन कोळपेवाडीला (ता.कोपरगाव) गेल्या.
वडिलांनी अर्धा एकर जमीन दिली. सारिकाने एक गाय घेतली. मोलमजुरी सुरू केली. मुलांच्या शिक्षणासाठी वाट्टेल ते कष्ट करण्याची तयारी ठेवली.
अनिकेत व श्रीनाथ ही मुले हुशार निघाली.
अनिकेत १९व्या वर्षी पोलीस झाला. मुलाच्या अंगावरील खाकी वर्दी पाहून या मातेच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले.
संघर्षमय झोपडीत सुखाचा पहिला किरण प्रकाशमान झाला. श्रीनाथ स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. त्याला पोलीस उपनिरीक्षक व्हायचे आहे.
....
आमची आई स्वत:च्या बालपणापासून परिस्थितीशी लढली. तिच्या नशिबी संघर्ष आला. तो संघर्ष डोळ्यांनी पाहिला. या संघर्षाची जाणीव ठेवून आम्ही दोघा भावांनी शाळेत अभ्यास केला. मी पोलीस झालो. श्रीनाथ स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. हे यश आईच्या श्रमाच्या धामातून मिळाले आहे. सलाम आमच्या मातेला.
- अनिकेत वाबळे, महाराष्ट्र पोलीस, म्हातारपिंप्री, ता.श्रीगोंदा