अकोले तालुक्यातील दुर्गम भागातील ५२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. पहिल्या टप्प्यात बिनविरोधचे वारे सुरू झाले त्यामुळे पहिल्या चार पाच दिवसांत अर्जसंख्या शून्य होती; मात्र गावागावात पारंपरिक राजकीय शत्रूंनी एकत्र येत आपलेच प्यादे बसवल्याने शेवटच्या टप्प्यात अचानक संख्या वाढली. उमेदवारी अर्ज भरणे, जात पडताळणी यासाठी ऑनलाइन प्रक्रिया असल्याने सोमवारी दोनशेच्यावर तर मंगळवारी पाचशेपेक्षा जास्त अर्ज दाखल झाले; मात्र अकोले तालुक्यात बीएसएनएलसह खासगी कंपन्यांचे नेटवर्किंग चालत नसल्याने रात्री-अपरात्री सायबर कॅफेमध्ये कुडकडणाऱ्या थंडीमध्ये रेंजची वाट पहावी लागते आहे. एका अर्जासाठी किमान तासभर वेळ लागतो. वेळेत अर्ज भरले न गेल्यामुळे काहींना उमेदवारीला मुकावे लागणार आहे.
...........
पहिल्या पाच-सहा दिवसांत अर्ज अत्यंत कमी होते. दोन दिवसांत संख्या वाढली आहे. उमेदवारांनी सजग रहायला हवे. रात्रीदेखील ऑनलाइन अर्ज भरता येतात. नेटवर्कची अडचण आहेच; मात्र ठरल्या वेळेत ही प्रक्रिया होईल.
-मुकेश कांबळे, तहसीलदार, अकोले.