प्रासंगिक/सुधीर लंके/
संयमी नेता अशी थोरात यांची ओळख आहे. मात्र, ही त्यांची एक बाजू आहे. रणनिती ठरविण्यात व संघर्षातही थोरात माहीर आहेत हे त्यांनी गुजरात निवडणुकीत दाखवून दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बालेकिल्ल्यात जाऊन त्यांनी संघर्ष करण्याची भूमिका घेतली. राज्याच्या विधानसभा निवडणुकीतही दिल्लीवरुन फारसे नेते प्रचाराला आलेले नसताना थोरात यांनी राज्याचा गड लढवून जिंकला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष लेख. ‘थोरात-विखे असे आरोप प्रत्यारोप होत राहिले तर मी नगर जिल्ह्यापुरता मर्यादित होतो. आता मला या वादात पाडू नका. मला राज्याचे नेतृत्व करु द्या’, अशी गमतीशीर टिपण्णी गत महिन्यात बाळासाहेब थोरात यांनी नगरच्या पत्रकारांशी बोलताना केली. त्यांनी ही टिपण्णी गमतीने केली खरी. पण, नगरच्या राजकारणातील मर्म त्यांनी यातून सांगितले. ‘मला राज्याचे नेतृत्व करु द्या’, या विधानातून त्यांनी त्यांची पुढील दिशाही ध्वनित केली. नगर जिल्हा हा मातब्बर नेत्यांचा जिल्हा आहे. राज्याचे व देशाचे नेतृत्व करु शकतील असे ‘नायक’ या जिल्ह्याने दिले. रावसाहेब पटवर्धन यांनी एकेकाळी काँग्रेसच्या चळवळीला दिशा दिली. काँग्रेसच्या केंद्रीय समितीवर ते कार्यरत होते. नंतरच्या काळातही आबासाहेब निंबाळकर, बी.जे. खताळ पाटील, बाळासाहेब भारदे, रामराव आदिक, एस.एम.आय. असीर, गोविंदराव आदिक, बाळासाहेब विखे असे मोठे नेते जिल्ह्याने राज्याला दिले. मात्र, नगर जिल्ह्याला राज्याचे मुख्यमंत्रिपद अथवा नेतृत्व करण्याची संधी मिळू शकली नाही. याचा दोष राज्यातील नेत्यांपेक्षा नगर जिल्ह्यातील आपसी कुरघोड्यांना अधिक जातो. काँग्रेसमधील अंतर्गत भांडणातूनच नेत्यांचे व पर्यायाने जिल्ह्याचेही नुकसान झाले. तेच मर्म बहुधा थोरात यांनी आता ओळखले आहे. त्यामुळेच मला ‘थोरात-विखे’ या वादात पाडू नका, असे ते गमतीने म्हणाले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होताना तीन पक्ष एकत्र आले. यात काँगे्रेसच्या बाजूने थोरात यांची भूमिका महत्त्वाची होती. मुंबई व दिल्ली अशा दोन्ही पातळीवर त्यांचा शब्द प्रमाण होता. शिवसेनेसोबत जाण्याचा विचार पुढे आला तेव्हा कॉंग्रेसच्या ‘धर्मनिरपेक्ष’ तत्त्वाचे काय? हा मुद्दा चर्चेत आला. दिल्लीचे काँग्रेस श्रेष्ठी धर्मनिरपेक्षतेच्या तत्वासाठी जसे आग्रही होते. तसेच थोरातही होते. सत्ता स्थापनेच्या घडामोडी सुरु असताना सोनिया गांधी दिल्लीतील एका बैठकीत महात्मा गांधी, पंडित नेहरु, इंदिरा गांधी यांच्या प्रतिमांकडे बोट दाखवत काँग्रेस नेत्यांना म्हणाल्या ‘अगर हम शिवसेना के साथ गये तो ये लोग क्या कहेंगे?’ ‘लोग क्या कहेंगे?’ हा काँग्रेससाठी महत्त्वाचा मुद्दा होता. एकीकडे काँग्रेसने देशाला दिलेली मुल्ये, दुसरीकडे भाजपचे वाढते आक्रमण या पेचात काँग्रेस होती. त्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेस काय करणार? हा पक्ष सेनेसोबत जाणार का? याकडे देशाची नजर होती. अशा ऐतिहासिक पेचप्रसंगात राज्यात काँग्रेसचे नेतृत्त्व थोरात यांच्याकडे म्हणजेच नगर जिल्ह्याकडे होते. काँग्रेसने शिवसेनेसोबतच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला हे ऐतिहासिक पाऊल आहे. ही महत्त्वाची घटना आहे. भाजपला रोखण्यासाठी सेनेसोबत जावे लागले तरी चालेल अशी बहुतांश काँग्रेस कार्यकर्त्यांची भूमिका होती, दुसरीकडे काँग्रेसच्या धर्मनिरपेक्ष तत्त्वांचे काय? हाही मुद्दा होता. या द्वंद्वात किमान सामायिक कार्यक्रमासारखा पर्याय काढून सरकार स्थापन झाले. थोरात यांचे राजकीय धाडस यात दिसले. भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसने जे पाऊल उचलले त्याचे नंतर देशातील इतर राज्यातूनही स्वागत झाले. किमान समान कार्यक्रमावर वैचारिक मतभिन्नता असणारे पक्ष एकत्र येऊन भाजपचा मुकाबला करु शकतात, हा संदेश या महाविकास आघाडीने देशाला दिला. ही आघाडी साकार होण्यात थोरात यांची भूमिका महत्त्वाची ठरली. शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या पंक्तीत थोरातही उठून दिसले. ते दबले अथवा बिचकलेले दिसले नाहीत. राज्यघटनेने सांगितलेले धर्मनिरपेक्षतेचे तत्व या सरकारला पाळावे लागेल अशी ठाम भूमिका थोरात यांनी महाविकास आघाडीतही घेतली. नागरिकत्वाच्या कायद्याबाबतही ते काँग्रेसच्या भूमिकेसोबत ठाम आहेत. या कायद्याच्या विरोधात बोलत आहेत. यशवंतराव चव्हाण यांचे दिल्ली दरबारी कॉंग्रेस श्रेष्ठींकडे वजन होते. सध्या काँग्रेसमध्ये थोरात यांना तो सन्मान मिळाला आहे. नगर जिल्ह्याच्या दृष्टीने ही जमेची बाजू आहे. नगर जिल्ह्यातून रावसाहेब पटवर्धन यांच्यानंतर कॉंग्रेसच्या केंद्रीय समितीवर जाण्याचा मान थोरात यांना मिळाला आहे. महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांच्यासोबत थोरात यांचा शपथविधी झाला. काँग्रेसच्या वतीने महत्त्वाचे खाते थोरात यांना दिले गेले. काँग्रेसने कदाचित विधानसभेचे अध्यक्षपद घेतले नसते, तर उपमुख्यमंत्रीपदाची संधी थोरातांकडे आली असती. मात्र, थोरात यांनी त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केलेले दिसले नाहीत. आपल्या एका मंत्र्याला पालकमंत्रीपदाची संधी मिळत नाही असे पाहून त्यांनी स्वत: पालकमंत्रीपद नाकारले. अनेक नेत्यांनी भाजपची वाट धरली असताना थोरात काँग्रेसवर निष्ठा ठेऊन पाय रोवून उभे राहिले. राजकारणात असा ठामपणाही हवा असतो. थोरात यांच्या रुपाने नगर जिल्ह्याला राज्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. भविष्यात राज्यात काँग्रेस आणखी बळकट झाली तर ते श्रेय थोरात यांचे राहील. नगर जिल्ह्याचाही विकासाचा काही अनुशेष आहे. तो दूर करण्यासाठी नगर जिल्हाही त्यांच्याकडे आशेने पाहतो आहे. वादात न पडता नगर जिल्ह्याच्या राजकारणाचा पदर रुंद करण्याचे सूतोवाच थोरात यांनी केले आहेत. तसे झाले तर तो नगर जिल्ह्याचाही भाग्योदय राहील. निळवंडे धरणाच्या आदर्श पुनर्वसनाचा पॅटर्न थोरात यांनी राज्याला दिला. यापूर्वी मंत्री असताना महसूल खात्यातही राजस्व अभियानासारखे महत्त्वाचे निर्णय त्यांनी घेतले. थोरातांची या सरकारमधील कारकीर्द नुकतीच सुरु झाली आहे. स्वत:चे खाते सांभाळताना आघाडीतील दुवा तसेच मुंबई व दिल्लीतील दुवा म्हणूनही त्यांच्यावर जबाबदारी आहे. नगर जिल्ह्याचेही अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या नगर शहराचा विकासच रखडला आहे. प्रत्येक तालुक्याचे वेगवेगळे प्रश्न आहेत. यात थोरात यांना भागीदारी द्यावी लागेल. महाविकास आघाडी सांभाळताना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना जपण्याचे शिवधनुष्य त्यांना पेलायचे आहे. ‘पक्ष सोडून गेले त्यांना जाऊद्या. रिकाम्या जागा धरा,’ असा सल्ला त्यांनी नव्याने राजकारणात येऊ पाहणाºया तरुणांना दिला आहे. यशवंतराव चव्हाण यांनी तरुण कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली होती. थोरातही त्याच वाटेने जाऊ पाहत आहेत. संगमनेर येथे तरुण आमदारांना जनतेसमोर पाचारण करुन त्यांनी तो संदेश देण्याचा प्रयत्न केला.