घारगाव : औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील कायगाव येथे सोमवारी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी तरुणाने गोदावरीच्या नदीपात्रात उडी घेतली. त्यामध्ये या तरुणाचा मृत्यू झाला. त्यामुळे मराठा समाजामध्ये संतापाची लाट उसळली. या घटनेच्या निषेधार्थ घारगाव (ता. श्रीगोंदा) येथे रास्ता रोको करण्यात आला.घटनेच्या निषेधार्थ दुकाने बंद करून कडकडीत बंद पाळण्यात आला. सकाळी ९ वाजता घारगाव येथे नगर-दौंड रोडवर सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या दूर पर्यंत रांगा लागल्या होत्या. घारगाव येथील सर्व संघटनांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पडवळ पोलीस फोजफाट्यासह काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून उपस्थित होते. तरुण कार्यकर्त्यांची भाषणे झाली. काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पोलीस निरीक्षक राजेंद्र पडवळ यांना निवेदन देण्यात आले.
श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथे रास्ता रोको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 2:21 PM