संगमनेर तालुक्यातील लसीकरण केंद्रांवर कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांची रॅपिड अँटिजन टेस्ट करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी शनिवारी (दि.८) दिले. व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे घेण्यात आलेल्या बैठकीत हे आदेश देण्यात आले. त्यानुसार कार्यवाही करण्यात येत आहे. लसीचा पहिला व दुसरा डोस घेण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची रॅपिड अँटिजन टेस्ट होणार आहे. ही टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास त्या व्यक्तीचे लसीकरण न करता त्याची लक्षणे बघून सौम्य लक्षणे असल्यास लसीकरण केंद्राजवळच्या कोविड हेल्थ केअर सेंटरमध्ये व मध्यम तीव्र स्वरूपाची लक्षणे असल्यास लसीकरण केंद्राजवळच्या डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात येणार आहे. याबाबतचा अहवाल संगमनेर पंचायत समितीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप व घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजकुमार जऱ्हाड यांनी तहसील कार्यालयाला सादर करावा, असेही निर्देश दिले आहेत.
लसीकरणासाठी संगमनेरात रॅपिड अँटिजन टेस्ट बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2021 4:22 AM