सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा येथील बाजारतळावरील चौकातच आरोग्य विभागाने विनाकारण फिरणाऱ्यांची रॅपिड व आरटीपीसीआर तपासणीची धडक मोहीम हाती घेतली. जोडीला नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीतील सातत्य टिकवून ठेवण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन आग्रही राहिले. त्यामुळे येथील कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने घट झाली. त्यामुळे ग्रामस्थांनी काहीसा सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
असे असले तरी त्यातील सातत्यात खंड पडला म्हणजे निष्काळजीपणा आला. गर्दी वाढली, मास्क, फिजिकल डिस्टन्सिंगकडे कानाडोळा केला तर हाच कमी झालेला आकडा पुन्हा झपाट्याने वाढू शकतो, असे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. सोमवारी (दि.३१) झालेल्या तपासणीत ३० निगेटिव्ह, तर ४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यात सुप्यातील एकही रुग्ण नव्हता. ते रुई छत्रपती येथील होते, असे आरोग्य सेविका अंजली वर्पे यांनी सांगितले.
रविवारी (दि.३) सापडलेल्या ५ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ३ सुप्यातील, तर प्रत्येकी एक बाबुर्डी व भोयरे येथील होता. शनिवारी (दि.२९) सापडलेल्या ४ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी २ सुप्यातील व २ रांजणगावमधील होते, अशी माहिती समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. विद्या बारवकर यांनी दिली. मध्यंतरी येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्येने पस्तीशी पार केल्यानंतर ग्रामस्थही भयभीत झाले होते, तर प्रशासन खडबडून जागे झाले होते.
त्यानंतर ग्रामपंचायतीचे ग्राम विस्तार अधिकारी अशोक नागवडे व त्यांचे कर्मचारी यांची टीम मैदानात उतरली व नियमात कामे सुरू झाली. आरोग्य विभागाची टीम दररोज जवळपास किटच्या उपलब्धतेनुसार १०० रॅपिड व ५० च्या आसपास आरटीपीसीआर चाचण्या करू लागल्याने परिणाम समोर आला. झपाट्याने पॉझिटिव्ह रुग्णसंख्येचा आलेख खाली आला असल्याचे अशोक नागवडे यांनी सांगितले. याकामी सरपंच मनीषा रोकडे, उद्योजक योगेश रोकडे, उपसरपंच सागर मैड व त्यांचे सहकारी, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविस्तार अधिकारी अशोक नागवडे व त्यांची टीम, पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे व त्यांचे सहकारी यांची मदत लाभली.
---
आरोग्य विभागाचे सहकार्य...
कोरोना चाचणी करण्यासाठी आरोग्य समुदाय अधिकारी डॉ. विद्या बारवकर, आरोग्यसेविका अंजली वरपे, आरोग्यसेवक विजय भोईर, तृप्ती बेल्हेकर व आरोग्य सहायक संजय साठे व प्रवीण शिंदे यांच्या टीमने चांगले काम केल्याने रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यात यश मिळाल्याचे ग्रामपंचायत सदस्य प्रताप शिंदे, बाळासाहेब औचिते, दत्तानाना पवार, उद्योजक शरद पवार यांनी सांगितले.