अहमदनगर : राष्ट्रीय समाज पक्षाने जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला असून, आरक्षण जाहीर होताच बेलवंडी (श्रीगोंदा) जिल्हा परिषद गटातून पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुनीता हिरडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे़ पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व कॅबिनेट मंत्री महादेव जानकर यांनी स्वत: ही उमेदवारी जाहीर केल्याने रासप पूर्ण ताकदीने या निवडणुकीत उतरणार असल्याचे संकेत दिले आहेत़ जिल्हा परिषद व पंचायत समितीची आरक्षण सोडत जाहीर होताच इच्छुकांनी मोर्चेबांधणीला प्रारंभ केला आहे़ गट व गणांच्या नवीन रचनेत अनेकांची अडचण निर्माण झाली आहे़ सर्वच पक्षांतील इच्छुक व श्रेष्ठी नवीन रचनेनुसार निवडणुकीची रणनीती ठरविण्यात व्यस्थ आहेत़ रासपने पहिली उमेदवारी जाहीर करत थेट मैदानात उतरल्याचे स्पष्ट केले आहे़ शिर्डी येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या रासपच्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात पक्षाचे राष्ट्रीय सचिव दशरथ राऊत यांनी इतर पक्षांच्या आधी नगर जिल्ह्यात सर्व जि़प़ गटात उमदेवार जाहीर करणार असल्याचे सांगितले़ जिल्हा परिषद निवडणूक स्वतंत्र लढण्याचे रासपने आधीच जाहीर केले होते़ त्यामुळे इतर प्रस्थापित पक्षांत संधी न मिळणारे इच्छुक रासपचा पर्याय आजमावू शकतात़ जानकर यांचा जिल्ह्यात मोठा संपर्क आहे़ गेल्या वर्षभरात तालुका व गावपातळीवर रासप पदाधिकाऱ्यांनी जनसंपर्क अभियान राबवित संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे़ त्यातच जानकर यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्याने स्थानिक पदाधिकाऱ्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे़ आता जिल्हापरिषद निवडणुकीत रासप प्रस्थापित पक्षांसमोर किती मोठे आव्हान निर्माण करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे़ (प्रतिनिधी)
‘रासप’ जिल्हापरिषद मैदानात
By admin | Published: October 09, 2016 12:34 AM