सुदाम देशमुख
अहमदनगर : नगर शहरात औरंगाबाद रोडला मोकळ््या जागांचे दर सर्वाधिक आहेत. कापड बाजारात फ्लॅट आणि जागांचा दर नेहमीप्रमाणे सर्वाधिक असला तरी सध्या स्थिर आहे. सावेडी, भिस्तबाग परिसरात फ्लॅटचे दर सर्वाधिक असून सर्वात महागडे असल्याचे दिसून येते. औरंगाबाद रोड परिसरातही जागांचा विकास वेगाने सुरू असल्याचे रेडीरेकनर दरांवरून स्पष्ट झाले आहे.
राज्य सरकारने गत आठवड्यात रेडीरेकनरचे (मिळकतीचे सरकारने निश्चित केलेले वास्तव बाजारमूल्य) नवे दर जाहीर केले. जिल्ह्यात सरासरी १.४६ टक्क्यांनी रेडीरेकनरच्या दरात वाढ झाली आहे. २०१७-१८ साठीचे दर १ एप्रिल २०१७ रोजी जारी केले होते.
स्थावर व्यवसायातील मंदी विचारात घेऊन २०१७-१८ मधील वार्षिक दर तक्ते, तसेच मूल्यांकन मार्गदर्शक सूचना व नवीन बांधकामाचे दर सन २०१८-१९ व २०१९-२० या दोन्ही वर्षांसाठी कायम ठेवण्यात आले होते, असे येथील मुद्रांक जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांनी सांगितले. यंदाही कोरोनामुळे एक एप्रिलऐवजी थेट सप्टेंबर महिन्यात रेडीरेकनरच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली असून ती फारसी परिणामकारक ठरणार नाही, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.२०१७-१८ च्या तुलनेत जुन्या नगर शहरातील जागांचे भाव ४ ते १० टक्क्यांनी घसरले आहेत. जुन्या शहरात पार्किंगच्या अडचणी, सोयी-सुविधांचा अभाव, वाहतुकीची समस्या यामुळे जुन्या भागात घर घेण्यास नागरिकांची पसंती नसल्याचे दिसते आहे. भिंगार भागात जागांचे भाव दीड टक्क्यांनी वाढले आहेत. बुरुडगाव रोडला २.९४ टक्के, पुणे रिंग रोडला ९ टक्के, शहरातील डीपी रोडच्या परिसरातील जागांचे दर २३ टक्के वाढले आहेत. मनमाड रोड येथील जागांचे दरही ४ टक्क्यांनी वाढले आहेत.
फ्लॅटच्या दरांमध्ये जुन्या नगर शहरात कोणतीही वाढ किंवा घट झालेली नाही. बोल्हेगाव येथील विकास योजना रोड परिसरात ९ टक्के, नागापूर शिव रोड परिसरात ८.९९ टक्के, भिंगारला ९ टक्के, पाईपलाईन रोडला ७.४२ टक्के, छावणी परिषद क्षेत्रात ६.५३ टक्के रेडीरेकनरचे म्हणजे जागांचेदर वाढले आहेत. आयटीआय, बुरुडगाव रोड परिसरात ९ टक्के, तर चाहुराणा खुर्दमध्ये ४.७ टक्के दरवाढ झाली आहे.
मोकळी जागा फ्लॅट परिसर २०१७-१८ २०२०-२१ २०१७-१८ २०२०-२१चितळे रोड ३८९०० ३७२०० ५२६०० ५२६००कापड बाजार ६१५८० ५५९०० ७४५०० ७४५००बोल्हेगाव ४८०० ४८०० २३३०० २५६३०भिंगार १०००० १०१५० २५२०० २७७००भिस्तबाग ८६५० ८६५० २८२०० ३०४६०कॅन्टोन्टमेंट १७५९० १७५९० ३२२०० ३४४५०बुरुडगाव रोड ४९६० ५११० २०६०० २२६६०पुणे रिंग रोड ९२२० १०१४० २४९०० २४९००केडगाव ९४८० ९४८० २८६०० २८६००माळीवाडा ४८७० ४८७० २०४०० २०४००नालेगाव ७२५० ७२५० २२८०० २२८००सावेडी १३८४० १३८४० ३०५०० ३०५००औरंगाबाद रोड १६८७० १६८७० ३२२०० ३२२००