जामखेड : रत्नापूर (ता.जामखेड) येथे रत्नदीप मेडिकल फाउंडेशन ॲण्ड रिसर्च सेंटरमार्फत संस्थेच्या नर्सिंग, फार्मसी व होमिओपॅथिक महाविद्यालयाच्या शैक्षणिक संकुलात शंभर बेडचे कोविड सेंटर लवकरच सुरू होणार आहे. यामध्ये ५० ऑक्सिजन बेड व चार व्हेंटिलेटरचीही सुविधा असणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे व सचिव डॉ. वर्षा मोरे यांनी दिली.
मागील वर्षी कोरोना प्रादुर्भावाच्या पहिल्या टप्प्यात स्थानिक प्रशासनाने संस्थेच्या शैक्षणिक संकुलात कोविड केअर सेंटर सुरू केले होते. कोरोनाचा झपाट्याने वाढता प्रादुर्भाव पाहता जामखेड व कर्जत तालुक्यातील लोकांसाठी यावेळीही रत्नदीप संस्थेमार्फत कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येथे ५० ऑक्सिजनचे ५० सर्वसाधारण बेड, चार व्हेंटिलेटर उपलब्ध करण्यात येणार आहे, असेही भास्कर मोरे यांनी सांगितले. तसेच गरज भासल्यास अतिरिक्त बेड संख्या वाढविणे शक्य असल्याचेही त्यांनी सांगितले.