रियाज सय्यदकोपरगाव : तालुक्यातील रवंदे गावातील २५ तरूण शेतक-यांनी स्थापन केलेल्या ‘फार्मिंग फर्स्ट’ गटाच्या माध्यमातून ग्रामीण भागात पिकणा-या सेंद्रीय शेतीमालास मुंबईत बाजारपेठ मिळविली आहे. ‘शेतकरी ते थेट ग्राहक’ बाजारपेठेमुळे गटाचा मोठा आर्थिक फायदा झाला आहे.शेतीत विविध प्रयोग करून पिकविलेल्या मालाला बाजारभावच नसेल तर वेळप्रसंगी शेतीमाल फेकून द्यावा लागतो. त्यावर उपाय शोधून काढण्यासाठी रवंदे गावातील २५ तरूण शेतकरी एकत्र आले. सेंद्रीय शेती व दर्जेदार उत्पादनाची आवड असलेले हे शेतकरी आपल्या शेतात उत्पादीत मालास बाजारपेठ शोधत होते. त्यांना प्रभारी तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, प्रकाश आहेर व रवींद्र गायधनी यांनी मार्गदर्शन केले. त्यातून प्रेरणा घेत शेतक-यांनी ‘आत्मा’ अंतर्गत ‘फार्मिंग फर्स्ट’ नावाचा शेतकरी गट स्थापन केला. गटातील प्रवीण कदम यांच्या भावामार्फत शेतक-यांनी २५ नोव्हेंबर २०१७ रोजी मुंबईतील एका उच्चभ्रू सोसायटीशी ‘फार्मिंग फर्स्ट’ गटाचा करार केला. सोसायटीला लागणारा भाजीपाला व इतर शेतीमाल या गटाद्वारे आठवड्यात एकदा पुरविला जातो. त्यातून शेती व वाहतुकीचा खर्च वजा जाता ‘फार्मिंग फर्स्ट’ला मोठा आर्थिक नफा मिळत आहे. शेतीमालास बाजारभावापेक्षा जास्त दर मिळत असल्याने गटातील शेतक-यांचे मनोबल वाढले आहे.
रवंदेच्या ‘फार्मिंग फर्स्ट’ला मुंबईची बाजारपेठ; शेतकरी ते ग्राहक थेट शेतमाल विक्रीचा प्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 5:10 PM