अहमदनगर: महापालिकेच्या सभागृह नेतेपदी भाजपचे नगरसेवक रवींद्र बारस्कर यांची सोमवारी नियुक्ती करण्यात आली. महापौर बाबासाहेब वाकळे यांनी बारस्कर यांना नियुक्तीचे पत्र दिले. गेल्या अडीच वर्षांतील बारस्कर हे तिसरे सभागृहनेते आहेत.
महापालिकेत राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भाजपची सत्ता आहे. सभागृहनेता निवडण्याचा अधिकार महापौरांना असतो. भाजपचे नगरसेवक रवींद्र बारस्कर हे महापौर वाकळे यांचे निकटवर्तीय आहेत. स्थायी समितीच्या सदस्यपदी बारस्कर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. स्थायी समिती पाठोपाठ बारस्कर यांची सभागृह नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. स्थायी समिती सदस्यासह सभागृहनेता अशी दोन्ही महत्त्वाची पदे मिळालेले बारस्कर हे पहिले नगरसेवक आहेत. बारस्कर यांची सभागृह नेतेपदी करण्यात आल्याने मनोज दुल्लम यांचे सभागृहनेते पद रद्द झाले. गेल्या अडीच वर्षांत सभागृहात नेते म्हणून भाजपने सुरुवातीला स्वप्निल शिंदे आणि त्यानंतर दुल्लम आणि बारस्कर या तिघांना संधी दिली. मनोज दुल्लम व भाजपचे शहराध्यक्ष भैय्या गंधे हे तसे एकाच प्रभागातील नगरसेवक आहेत. दुल्लम यांचे पद काढून घेतल्याने एक प्रकारे महापौरांनी गंधे यांनाच धक्का दिल्याची चर्चा आहे.
------------
मनोज दुल्लम यांनी कामात व्यस्त असल्याने हे पद सांभाळू शकत नाहीत, असे सांगितले होते. त्यांनी स्वत:हून नकार दिल्याने नगरसेवकांची बैठक घेण्यात आली. पद द्यावे, अशी बारस्कर यांची सुरुवातीपासूनची मागणी होती. नगरसेवकांनीही त्यांच्या नावाची शिफारस केली. त्यामुळे त्यांची सभागृह नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
-भैय्या गंधे, शहराध्यक्ष, भाजप
.....
- सभागृह नेतेपदी नियुक्ती करावी, अशी मागणी पक्षाकडे केली होती. परंतु, नवीन असल्याने आपल्याला थांबण्यास सांगितले होते. मनोज दुल्लम यांच्या सहमतीने हा निर्णय झाला असून, लवकरच पदभार स्वीकारणार आहे.
- रवींद्र बारस्कर, सभागृहनेते
-----------
...तर दोन महिन्यासाठी एक नेता
सभागृह नेतेपद हे एक खेळणे झाले आहे. नगरसेवकाची प्रतिष्ठा वाढविण्याच्या नादात पदाधिकाऱ्यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली आहे. दुल्लम हे पद सांभाळू शकत नव्हते तर त्यांनी हे पद कशासाठी घेतले, हे एक कोडेच आहे. चार महिनेही हे पद त्यांच्याकडे राहिले नाही. आता यापुढे दर दोन-दोन महिन्याला किंवा प्रत्येक सर्वसाधारण सभेला एकाची सभागृह नेतेपदावर नगरसेवकाची वर्णी लावणेच बाकी राहिले आहे, अशा शब्दात एका माजी पदाधिकाऱ्याने भाजपच्या या अंतर्गत राजकारणाची खिल्ली उडवली.